स्वयंम न्यूज ब्युरो
ठाणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. वयाची ६९ वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो, असे सूचक वक्तव्य नाईकांनी रविवारी नवी मुंबईतील आयोजित सायक्लोथॉनच्या वेळी केले आहे. त्यामुळे राजकारला आता नवे वळण येणार का ? अशी चर्चा सुरू आहे. गणेश नाईकांनी ठाण्यातून लोकसभा लढल्यास शिवसेनेच्या गडाला हादरा बसण्याची राजकारणात भीती व्यक्त केली जात आहे. गणेश नाईक निवडणूक रिंगणात उतरल्यास ठाण्यातील एकनाथ शिंदे व राजन विचारेविरोधक पडद्याआडून व वेळ पडल्यास पडद्यावर येवूनही गणेश नाईकांचे काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वच्छ पर्यावरण पूरक आणि आरोग्यमय मुंबई चा संदेश देण्यासाठी रविवारी नवी मुंबई ‘महासायकलेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या वयातही आपण ठाण्यापर्यंत जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य केले. या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी आगामी लोकसभा निवडणूकीची ही तयारी असल्याचे म्हटले जात आहे. ठाणे लोकसभेसाठी ठाणे मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द शरद पवारांनीच केली होती. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नाईक कुटुंब लोकसभा निवडणूक लढवणार का ? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.. मात्र आता नाईकांच्या या सूचक वक्तव्यानंतर स्वतः गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. नाईक निवडणूक लढवणार का ? त्याचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गणेश नाईकांनी २००९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपर्यत बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे राज्यात प्रतिनिधीत्व केलेले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा अशिया खंडातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. १९९०च्या , १९९५च्या आणि २००४च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत या बेलापुर मतदारसंघातून एक लाखापेक्षा अधिक विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. २००९च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी बेलापूर या विधानसभा मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले. त्यापैकी ऐरोली व बेलापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातच निर्माण झाले. २००९ साली गणेश नाईक बेलापूर मतदारसंघातून विजयी झाले तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीवर मोदी लाटेचा प्रभाव असल्याने १३०० मतांनी गणेश नाईकांना पराभूत व्हावे लागले.
लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील मातब्बर नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षसुप्रीमो शरद पवार यांनी सुरूवातीपासून धरला आहे. गणेश नाईक, छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटील, जयंत पाटील यासारख्या मातब्बरांना लोकसभा लढविण्याचे निर्देशही पवारांनी दिले होते. सुरूवातीला सर्वानीच स्वारस्य दाखविले नसले तरी गणेश नाईकांनी रविवारी कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. नवी मुंबई हे गणेश नाईकांचे ‘होमपीच’ असल्याने व मोदी लाटेचा २०१४च्या तुलनेत प्रभाव ओसरल्याने राजन विचारेंना नवी मुंबईतून मतदान काढणे अवघड होवून बसणार आहे. गत निवडणूकीत २०१४ साली नवी मुंबईतून शिवसेनेच्या राजन विचारेंना ४७ हजाराची आघाडी मिळाली होती. तथापि गणेश नाईक हे नवी मुंबईकर उमेदवार असल्याने स्थानिक उमेदवार म्हणून नवी मुंबईकर गणेश नाईकांची पाठराखण करण्याची शक्यता आहे. त्यातच भाईंदरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राशी गणेश नाईकांचा आजही व्यक्तीगत संपर्क असल्याने गणेश नाईकांची उमेदवारी राजन विचारेंसाठी पर्यायाने शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांनी शिवसेनेत अनेक वर्ष काम केल्याने ठाण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी, नगरसेवकांशी, नेत्यांशी आजही गणेश नाईकांचे घरोब्याचे संबंध आहेत. राजन विचारे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्य नसणारे शिवसेनेचे घटक गणेश नाईकांना मदत करण्याची भीती शिवसेनेच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गंणेश नाईकांच्या लोकसभा निवडणूकीतील सूतोवाचामुळे शिवसेनेचे अंर्तगत राजकारण ढवळून निघाले असून ‘गणेश नाईक की ललकारी, अब दिल्लीपर सवारी’ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांकडून सोशल मिडीयावर संदेश ‘व्हायरल’ होवू लागला आहे.
ठाणे लोकसभा २०१४ निकाल
- रांजन विचारे (शिवसेना) – ५ लाख ९५ हजार ३६४
- संजीव नाईक (राष्ट्रवादी) – ३ लाख १४ हजार ६५
- अभिजीत पानसे (मनसे) – ४८ हजार ८६३