स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी लाभदायक अशा विविध सुविधांची दर्जेदार परिपूर्ती केली जात असून सीबीडी बेलापूर सेक्टर 3 ए येथे राजीव गांधी स्टेडियमजवळ बहुउद्देशीय इमारत स्वरूपात बांधण्यात आलेल्या वारकरी भवनाचा लोकार्पण समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांचे समवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन.,परिवहन समितीचे सभापती श्री. रामचंद्र दळवी, अ प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. विशाल डोळस, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती श्रीम. मिरा पाटील, स्थानिक नगरसेवक डॉ. जयाजी के.नाथ, नगरसेवक श्री. अशोक गुरखे, माजी नगरसेविका श्रीम. शैला नाथ, शहर अभियंता श्री.सुरेंद्र पाटील, बेलापूर विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये तसेच अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांबद्दल संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात असल्याने सदर लोकार्पण समारंभ कोणत्याही प्रकारे भाषणे, स्वागत, सत्कार समारंभ न करता अत्यंत साधेपणाने कोनशिला अनावरण व फीत कापून करण्यात आला.
सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर येथे 1759.80 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंड क्र. 8 वर साधारणत: 20 कोटी 78 लक्ष रक्कम खर्च करून ही 3 मजली भव्यतम व आकर्षक इमारत उभारण्यात आली असून यामध्ये तळघरात 34 गाड्यांची पार्कींग व्यवस्था तसेच कॅटरिंग रूम व जनरल/लिनन रूम आहे. तळमजल्यावरही पार्कींगची व्यवस्था असून कार्यालय, डि.जी.रूम, किचन रूम व एच.टी. सबस्टेशन व जनरेटर रूम आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 285 लोकांची व्यवस्था होऊ शकेल असे सभागृह तसेच 2 वेशभूषा कक्षांची सुविधा आहे. दुस-या मजल्यावरही 90 लोकांची व्यवस्था होईल असे सभागृह तसेच 2 वेशभूषा कक्ष आहेत. याशिवाय तिस-या मजल्यावरही 192 लोकांची व्यवस्था होईल असे सभागृह तसेच 2 वेशभूषा कक्षांची व्यवस्था आहे. सर्वच मजल्यांवर महिला व पुरूषांकरिता स्नानगृहासह स्वतंत्र शौचालय व्यवस्था असून तिन्ही मजल्यांवर वातानुकूलन (एअर कंडिशनींग) व्यवस्था आहे. या इमारतीला दोन जीने असून मुख्य प्रवेशव्दाराजवळ प्रत्येकी 6 प्रवासी क्षमतेच्या 2 लिफ्ट्स आहेत तसेच मागील बाजूस 8 प्रवासी क्षमतेची सुविधा लिफ्ट व्यवस्था आहे.
सर्वच सोयीसुविधांनी परिपूर्ण असणारी व छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून बनविलेली ही इमारत नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी असल्याचे अभिप्राय सर्व मान्यवरांसह उपस्थित नागरिकांनीही दिले.