मुंबई : ७० वर्षात आमच्याशी न्याय झाला का? बाबासाहेबांनी जे संविधान दिले आणि राजकीय शक्ती बनण्याचे आवाहन केले. त्या संविधान विरोधात सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले. कोणी त्याला विरोध केला नाही. त्या रामदास आठवलेंनी तोंड उघडले ते फक्त चमच्यागिरी आणि जोक करण्यासाठी. आता तर युती झाल्याबर स्वतःच रडतायत मला काही दिले नाही म्हणून. आठवले यांनी स्वतःला जोक बनवून घेतले, अशा शब्दांत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी रामदार आठवले यांच्यावर टीका केली.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन प्रस्थापित आघाड्यांना पर्याय देण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमसोबत ‘वंचित बहुजन आघाडी’ची स्थापना केली आहे. या आघाडीची मुंबईतली पहिली सभा आज सायंकाळी दादर, शिवाजी पार्क येथे झाली. त्यात ओवेसी बोलत होते. नवी मुंबई-रायगड भागातून एमआयएमचे नेते हाजी शाहनवाझ खानही मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई व रायगडातून कार्यकर्ते घेवून सभेला गेले होते. सभेला वंचित भटके, ओबीसी, आदिवासी, कोळी, आगरी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
मुंबईतील शिवाजी पार्कवर वंचित बहुनज विकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर हा मौलाना नाही, तर सैतान आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टीव्हीवर बसून सल्ले देऊ नये. आधी उरी, पठानकोट आता पुलवामात हल्ला झाला. त्यामुळे तुमच्या शब्दांवर आमचा विश्वास नाही, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
‘पुलवामा हल्ल्यास पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर सैतान आहे. जैश-ए-मोहम्मद नव्हे ती जैश-ए-सैतान संघटना आहे. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्व एक आहोत हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे. भारतात विविधतेत एकता आहे. हिंदुस्थानात मशिदीत नमाज अदा होणार, मंदिरात घंटा वाजणार हे लक्षात ठेवा. पाकिस्तानातील राजकारण्यांनी भारतातल्या मुस्लिमांची चिंता करु नये,’ अशा शब्दात खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी पाकिस्तानला ठणकावले. पुलवामा हल्ला मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, अशी टीका करत मोदी सरकार आणि काँग्रेसला धडा शिकवण्याची ही शेवटची संधी आहे, असं म्हणत मतदारांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन ओवेसी यांनी केले.
‘अब की बार ना मोदी ना राहुल अब की बार सिर्फ प्रकाश आंबेडकर’ असा नारा ओवेसींनी दिला. जर तुम्ही केवळ अल्लाहला घाबरता तर तुम्ही मोदी, राहुल, ठाकरे, पवारांना का घाबरता, आपला अधिकार मिळवा, असे आवाहन ओवेसींनी मुस्लिम बांधवांना केले.
आम्ही पाकिस्तानच्या धमकीला भीक घालत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले २०० किलो आरडीक्स आलेच कसे? ४० जवान शहीद झाले त्याला जबाबदार कोण? हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का? असा सवाल करत पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
दलितांना न्याय कोण देणार? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, शरद पवार की ठाकरे देणार आहेत. हे सारे पेशवे आहेत. त्यामुळे सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करा. त्यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेल, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
भारताच्या राजकारणात क्रांती होत आहे. आता २८० चे सरकार नाही बनणार. मुस्लिमांच्या तबाही, बरबादीचे कारण काँग्रेस आहे. मुस्लिमांनी आता काँग्रेसचा साथ आणि नाद सोडून द्यावे. दहा वर्षात एक मुस्लिम खासदार नाही त्याला काँग्रेस जबाबदार. आता महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या मागे मुस्लिम समाजाने उभे राहावे, असे आवाहन सुद्धा असदुद्दीन ओवेसी यांनी केले.
मुस्लिमांनी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे. काँग्रेसमुळे मुस्लिमांना केवळ त्रास झाला आहे, अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केले. त्यांची महाआघाडी केमिकलमिश्रीत आहे, आमची महाआघाडी नैसर्गिक आहे, असे ओवेसी म्हणाले.