नवी मुंबई : स्वच्छतेसोबतच पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केले जात असून एकाच छताखाली झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे वैविध्य बघायला मिळणे हा नागरिकांसाठी आनंदाचा व माहितीचा खजिना प्रदर्शनातून खुला केला जात असून नवी मुंबई हे पर्यावरणपूरक शहर असल्याचा संदेश मागील १२ वर्षे या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रसारित केला जात असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत व विशेषत्वाने मुलांसमवेत या प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०१९ रोजी, शुक्रवार, शनिवार व रविवारी वंडर्स पार्क, से.१९ ए, नेरूळ येथे आयोजित झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांच्या प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक श्री. रविंद्र इथापे, माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती श्रीम. मिरा पाटील, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्री. गिरिश म्हात्रे, श्रीम. उषा पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी व श्री. रविंद्र पाटील, वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उपआयुक्त उद्यान श्री. नितीन काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परिक्षक श्री. दयानंद निमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार,पर्यावरण तज्ज्ञ तथा परीक्षक समिती प्रमुख श्री.व्ही.ए.रोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार श्री. संदीप नाईक यांनी १३ वर्षे सातत्याने प्रदर्शन आयोजित करून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याची भावना जागृत करणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक वर्षी प्रदर्शनाला भेट देणा-या नागरिकांच्या संख्येचा आलेख वाढतो आहे याबद्दल कौतुक केले. प्रदर्शनाच्या माध्यामातून विशेषत्वाने लहान मुलांना झाडे, फळे, फुलांचे मराठी व इंग्रजी भाषेतील नाव तसेच वनस्पती शास्त्रीय नाव माहित होते ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचे सांगत यामध्ये फुड क्राफ्टींग हा अतिशय आगळा वेगळा व आकर्षक प्रकार बघायला मिळाला असे सांगत या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्तीच्या क्षेत्रातही करियर घडविण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित कराव्यात अशी सूचना त्यांनी केली.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नागरिकांना व मुलांना निसर्गातील सर्व प्रकारच्या वैविध्य एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्यामुळे हे प्रदर्शन माहितीच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे सांगितले. कचरा वर्गीकरणानंतर त्यातील ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मितीचा उपयोग किचन गार्डन व टेरेस गार्डनसाठी कसा करावा याबाबत प्रदर्शनात माहिती मिळत असून त्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीही उपलब्ध असल्याने नागरिकांना याचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाच्या मनात एक शेतकरी असतो त्यामुळे त्या शेतक-याच्या मनातील पर्यावरणाविषयीचे प्रेम या प्रदर्शनाला भेट दिल्यावर निश्चित वाढेल व त्याचा उपयोग नवी मुंबई शहर पर्यावरणशील होण्यासाठी होईल असे ते म्हणाले.
या प्रदर्शनामध्ये झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे विविध प्रकार प्रत्यक्ष बघायला मिळाणार असून विविध २४ विभागांतर्गत प्रोत्साहनपर स्पर्धा घेण्यात येत आहेत. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता पाने, फुले, फळे, भाजीपाला यांच्या ओळख स्पर्धेचाही समावेश आहे.
प्रदर्शनामध्ये नामवंत उद्योगसमुह, शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होत असून फुलांची रांगोळी,फळे, फुले, भाज्या यांच्या कलात्मक रचना, बोन्साय, उद्यान रचना अशी नैसर्गिक विविधता अनुभवता येणार असून उद्यानाशी संबंधित विविध साहित्य, वृक्ष रोपे, वेली,पूरक खते आदी बाबींचे ८५ स्टॉलही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन, नर्सरी, गच्चीवरील शेती असे विविध माहितीपूर्ण स्टॉलही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध आहेत.
प्रदर्शनाच्या निमित्ताने शनिवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ४ या कालावधीत माती विना शेती व सेंद्रीय शेती या महत्वाच्या विषयावर माहितीपूर्ण कार्यशाळा संपन्न होणार असून ११ ते १ या वेळेत रंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दि.२२ फेब्रुवारी व शनिवार दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत गायन व वाद्यवृंदाचा मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
तरी दि. 22,23 व 24 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत विनामुल्य प्रवेश असणा-या या झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांच्या 13 व्या प्रदर्शनाला सेक्टर 19 अ नेरुळ येथील वंडर्स पार्क मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी व विशेषत्वाने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट द्यावी आणि निसर्गातील विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.