नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्यावर शिवसेनेचे नगरसेवक एम के मढवी आणि त्यांच्या गुंडांनी शुक्रवारी जीवघेणा हल्ला केला. आमदार नाईक यांच्यावर लोखंडी सळया, कैची आदी शस्त्रांनी हल्ला करण्यात आला तसेच त्यांची गाडी देखील फोडली. या हल्ल्याचे वृत्त कळताच संपूर्ण नवी मुंबईत संतापाची लाट उसळली. ऐरोलीत नागरिकांनी उर्स्त्फुत बंद पाळला. नगरसेवक मढवी, त्याची पत्नी नगरसेविका विनया, त्याचा मुलगा नगरसेवक करण यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे असे गंभीर गुन्हे रबाळे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.
ऐरोली सेक्टर ५ येथील नवी मुंबई महापालिकेने बांधलेल्या एका सभागृहाच्या उदघाटनासाठी आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे आदी मान्यवर सकाळी १०.३०च्या दरम्यान गेले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नाईक यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या समारंभप्रसंगी राजकीय श्रेयवादातून नगरसेवक एम के मढवी याने आमदारांना कुणी बोलावले? ते येथे कसे आले?असे प्रश्न विचारुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नगरसेवक मढवी हा आपली पत्नी आणि मुलासह आमदार नाईक यांच्या अंगावर धावून आला. कार्यक्रमप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आमदार नाईक हे समंजसपणे तेथून निघाले. त्यावेळेस नगरसेवक करण आणि त्याचे साथीदार त्यांच्या अंगावर धावून आले. आमदार महादयांचे पोलीस अंगरक्षक जाधव यांना मारहान केली. आमदार स्वतःच्या गाडीत जावून बसले असता तेथे करण आणि त्याच्या साथीदारांनी येवून कैची आणि रॉडने गाडीवर हल्ला केला. गाडीत बसलेल्या आमदार नाईक यांच्यावर प्रहार करण्याचा त्यांचा डाव होता. आमदार नाईक यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर एम के मढवी, नगरसेवक करण, नगरसेविका विनया मढवी, कुणाल म्हात्रे, अजय म्हात्रे, राजा यादव, त्याचा चालक अनिल मोरे, श्रषभ उपाध्यय यांच्यावर ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार नाईक यांच्यावरील हल्ल्याची माहिती कळताच रबाळे पोलीस ठाण्यात मोठया संख्येने राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मढवीविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या तसेच त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली. महापौर सुतार आणि उपमहापौर म्हात्रे यांनी देखील मढवीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
* मढवीला अटक न केल्यास रस्त्यावर उतरु- जिल्हाध्यक्ष अंनत सुतार यांचा इशारा
हल्ल्याची घटना सकाळी घडूनही नगरसेवक मढवी आणि इतर हल्लेखोरांना सायंकाळी उशिरापर्यत पोलीसांनी अटक केली नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्यासह आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, प्रदेश सरचिटणीस डॉ संजीव नाईक, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, प्रतोद डॉ जयाजी नाथ आदींनी पत्रकार परिषद घेवून मढवी आणि हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली. हल्लेखोरांना अटक केली नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुतार यांनी दिला. सभागृहाची वास्तू पालिकेची असताना मढवी यांनी ती स्वतःची असल्यासारखी समजून राजकीय लाभ उठविण्यासाठी बॅनरबाजी केली होती. मढवी याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सशस्त्र हल्ला करणे, शांतता भंग करणे, फसवणुक करणे इत्यादी गुन्हे मढवी यानेच पालिका निवडण्ाुकीतील प्रतिज्ञापत्रात नमूद केले असल्याची माहिती दिली. विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी असा प्रकार नवी मुंबईत आतापर्यत कधीच झाला नव्हता. मढवी सारखा लोकप्रतिनिधी ऐरोलीत आहे, याची आम्हाला लाज वाढते, अशी टिका जिल्हाध्यक्ष सुतार यांनी केली.
तर आमच्या संयमी, शांत भुमिकेला आमची कमजोरी समजू नका, हल्लेखोरांना त्वरीत अटक करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू, असा इशारा आमदार नाईक यांनी दिला. विकास कामांचे उदघाटन करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने आम्हाला दिला आहे. तो बजावण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, असे आमदार नाईक यांनी ठासून सांगितले. तर सभागृहाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाची वेळापत्रिका नगरसेवक मढवी यांना माहिती देवूनच काढण्यात आली होती. मात्र स्वतंत्र आमंत्रण पत्रिका छापून या कार्यक्रमाचे राजकीय श्रेय घेण्यासाठीच मढवी यांनी वाद केल्याचे महापौर म्हणाले.