स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ म्हणून कुस्तीला लोकप्रियता व लोकमान्यता आहे. नवी मुंबई या आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणा-या शहरातही अनेक उदयोन्मुख कुस्तीगीर आपल्या कुस्ती खेळाचे कसब पणाला लावताना दिसतात. अशा नवी मुंबई शहरातील व महाराष्ट्र राज्यातील कुस्तीगीरांना प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालिम संघाच्या सहकार्याने नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करीत असते.
याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उद्योन्मुख व होतकरु कुस्तीगीरांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्याचबरोबर राज्यातील इतर भागातील नामांकित कुस्तीगीरांचा खेळ प्रत्यक्ष अनुभवता यावा याकरीता प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय व नवी मुंबई महापौर श्री कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. 02 मार्च व 03 मार्च 2019 रोजी रा.फ.नाईक विद्यालय,कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
शनिवार दि. 2 मार्च 2019 रोजी, सायं. 5.00 वा. नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून रविवार, दि. 3 मार्च 2019 रोजी, रात्री. 07.00 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यासमवेत ठाणे लोकसभा सदस्य खा. श्री. राजन विचारे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. संदीप नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आ. श्री. रमेश पाटील,उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्री. शिवाजी कुलकर्णी,सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले आणि इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन्ही विभागात होणार आहेत. महिलांकरीता 45 ते 54 व 55 ते 65 या दोन वजनी गटात तसेच कुमार गटात 46 ते 50, 55 ते 65 (कुमार केसरी) असे दोन गट, पुरूष खुला गट 65 ते 73, 74 ते 100 (महापौर केसरी) अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे.
नवी मुंबई महापालिका स्तरामध्ये कुमार गटात 32 ते 40, 41 ते 45, 46 ते 50, 51 ते 60 अशा 4 वजनीगटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेतील महापौर केसरीकरीता रु.1 लाख, उपविजेता रु.60 हजार, तृतीय रु.40 हजार व चतुर्थ रु.30 हजार तसेच कुमार केसरी करीता रु.21 हजार, रु.11 हजार, रु.7 हजार व रु.5 हजार असे चार क्रमांकास पारितोषके असणार आहेत. कुमार केसरी व महापौर केसरी यांना चांदीची गदा व पट्टा देऊन सन्मानित करणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण स्पर्धेमध्ये एकुण रु.4.50 लाख इतक्या रक्कमेची पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
तरी कुस्तीप्रेमी रसिकांनी या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तर गाजविणा-या महाराष्ट्रातील नामांकीत कुस्तीगीरांचा खेळ बघण्यासाठी तसेच नवी मुंबईतील होतकरू कुस्तीगीरांना प्रोत्साहीत करण्यासाठी रा.फ.नाईक विद्यालय, से.8, कोपरखैरणे येथे 2 व 3 मार्च 2019 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री. मुनवर पटेल व उप सभापती श्री. गिरीश म्हात्रे आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.