सखापाटील जुन्नरकर
* विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप
* कोणतीही चौकशी न करता गंभीर कलमे वगळली
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्यावर ऐरोली येथे पालिका सभागृहाच्या उदघाटनप्रसंगी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक एम के मढवी, त्याची पत्नी नगरसेविका विनया, मुलगा नगरसेवक करण यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर आयपीसी कलम ३०७(जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे) सारख्या गंभीर गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. मात्र चोवीस तासांच्या आत कोणतीही चौकशी न करता राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली येवून नवी मुंबई पोलीसांनी गंभीर गुन्हयांची कलमे वगळली, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
आमदार नाईक यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. रविवारी रात्रीपर्यत नगरसेवक मढवीला अटक झाली नव्हती. त्यामुळे नवी मुंबईत नागरिक पोलीस प्रशासनावर प्रचंड संतापले आहेत. शनिवारी विरोधी पक्षनेते मुंडे यांच्यासह आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, युवक अध्यक्ष सुरज पाटील उपाध्यक्ष सुनिल सुतार आदींनी पोलीस आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेतली. फिर्यादीप्रमाणे दाखल कलमे कायम ठेवून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी मुंडे यांनी केली. नवी मुंबईचे पोलीस सत्ताधार्यांचे हुजरे बनले असून शहरात अशांतता माजविण्याची भुमिका बजावत असल्याचेही मुंडे म्हणाले. आम्हाला पोलीसांकडून न्याय मिळाला नाही तर पोलीस मुख्यालयासमोरच तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला.
* हल्याचे फुटेज असूनही दुर्लक्ष
आमदार संदीप नाईक यांची गाडी कात्री आणि इतर गोष्टींनी फोडतानाची दृष्ये प्रसिध्दी माध्यमांमध्ये येवूनही या फुटेजकडे पोलीसांनी दुर्लक्ष केले आहे. गाडीवर हल्ला झाला तेव्हां आमदार नाईक हे गाडीतच होते. त्यामुळे हल्लेखोरांचा त्यांच्यावर हल्ला करण्याचा डाव होता, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.