महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेली साडे चार वर्षे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना राज्याच्या गृहमंत्रीपदाचीही धुरा सांभाळत आहेत. आज ऐरोलीत घडलेल्या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान नक्कीच शरमेने खाली गेली असणार. ऐरोलीचे युवा व उच्चविद्याविभूषित आणि विशेष म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे आमदार संदीप नाईक यांना ऐरोलीतील महापालिकेच्या एका कार्यक्रमात शिवसेनेच्या एका नगरसेवकाने वापरलेली भाषा, त्यानंतर झालेले राडा प्रकरण आणि आमदार संदीप नाईकांच्या गाडीवर विविध हत्यारांनी चढविलेला हल्ला हे पाहता सर्व नियोजित षडयंत्रच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण गेली साडे नऊ वर्षे विधानभवनात वावरताना आमदार संदीप नाईकांना जवळून पाहिले असणार आणि अनुभवलेही असणार. कामाचा पाठपुरावा करणारा, परंतु काही प्रमाणात मितभाषी सुसंस्कृत असा हा आमदार. तोंडातून शिवराळ भाषा तर सोडा, पण शब्दानेही कोणालाही न दुखविणारा असा हा आमदार आपण सभागृहात साडे नऊ वर्षे जवळून पाहिला आहे. आज केंद्रात व राज्यात तुमच्या पक्षासोबत केंद्रात व राज्यात मांडीला मांडी लावून बसणाऱ्या पक्षाच्या सदस्यांनी हे भ्याड आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. त्यांनी दिवसाढवळ्या हे कृत्य करताना आपण स्थानिक पोलिसांना जुमानत नसल्याचे दाखवून देताना आपण गृहखात्यालाही जुमानत नसल्याचे आजच्या कृत्यातुन उभ्या महाराष्ट्रालाही दाखवून दिले आहे. ज्या माणसाच्या अंगात सुसंस्कृतपणा नाही, अंगावर विविध गुन्हे दाखल आहेत, असा माणूस दिवसाउजेडी ऐरोलीत महापालिकेच्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्थेच्या चिंध्या उडवित असताना स्थानिक पोलिसांनी त्या अराजक माजविणाऱ्या घटकांना अटक करण्यास टाळटाळ करावी याचाच अर्थ मुख्यमंत्रीसाहेब आपले गृहखाते तकलादू बनले आहे व आपला आपल्या गृहखात्यावर कोणताही ताबा राहीला नसल्याचे ऐरोली, नवी मुंबईनेच नाही तर उभ्या महाराष्ट्राने जवळून पाहिले.
ऐरोली नोड हा एकेकाळी गुन्हेगारीचे माहेरघर म्हणूनच ओळखला जायचा. परंतु आमदार संदीप नाईकांनी परिश्रमपूर्वक ऐरोली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलताना या मतदारसंघाचा एक शैक्षणिक चेहरा प्राप्त करून दिला. आता कुठे या शहराची गु्न्हेगारी प्रतिमा झाकली जात होती. परंतु आजच्या घटनेमुळे ऐरोलीमध्ये आजही खुलेआमपणे गुन्हेगारांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. वृत्तवाहिन्यांकडे बातम्यांचे फूटेज उपलब्ध आहेत, सोशल मिडीयावरही व्हिडिओ कार्यक्रमाचे फिरत आहेत. दिवसाउजेडी पालिकेच्याच कार्यक्रमात पालिकेचाच विश्वस्त म्हणविणाऱ्या संस्कृतीचा नंगानाच करावा, शिवराळ भाषा वापरावी, विवीध हत्यारांनी आमदारांच्या गाडीवर हल्ला चढविला जातो, हा प्रकार दिवसाउजेडी होतोय, हा तुघलकी प्रकार करणाऱ्याला अटक करावी, न्याय मिळावा यासाठी आमदार समर्थक हजारोच्या संख्येने स्थानिक पोलिस ठाण्यासमोर कायदा व सुव्यवस्थेचा आदर करत मागणी करत असताना कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. लोकसभा निवडणूका अवघ्या दीड महिन्यावर आल्या आहेत. उद्या पालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमात असे राडे होवू लागले अथवा लोकसभा निवडणूकीत गोंधळ घातला गेला तर या भागात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. येथे पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढल्यास व कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्यास मुख्यमंत्री फडणवीससाहेब गृहखात्याचे प्रमुख म्हणून याचे खापर नवी मुंबईकर तुमच्यावरच फोडतील. तुमच्या स्वच्छ प्रतिमेचा आम्हाला आदर आहे. आजच्या घटनेमुळे ऐरोलीकर भयभीत झाले आहेत. गुन्हेगार दिवसाढवळया नंगानाच करू लागले आहेत. या ठिकाणी एका उच्चविद्याविभूषित सुसंस्कृत आमदारावरच शेकडोच्या उपस्थितीत अशा घटना घडत असतील व पोलिस घटना करवित्यावर कारवाई करत नसतील तर ऐरोलीकरांनी आपल्या सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे? आजच्या घटनेने महाराष्ट्रात नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. ज्या शहरात आमदार सुरक्षित नसेल व हा नंगानाच करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर या ऐरोलीचे चंबळच्या खोऱ्यात रूपांतर होण्यास मुख्यमंत्रीसाहेब फारसा वेळ लागणार नाही.
- सखापाटील जुन्नरकर