राजेंद्र पाटील
पनवेल: कळंबोली वसाहतीत नवीन जलवाहिन्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर येत्या काही महिन्यात सिडकोकडून इतर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रस्ते, उद्यान, पदपथ आणि इतर सुविधांचा समावेश आहे.
कळंबोली वसाहतीत अनेक नागरी समस्यांनी डोके वर काढले होते. या आगोदर सिडकोने दुर्लक्ष केल्याने प्रश्नांची सोडवणुक झाली नाही. त्यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर महानगरपालिका अस्त्तित्वात आल्यानंतर सिडकोने आखडता हात घेतला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सिडकोचे अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी लक्ष्य टाकले आणि कामांचे प्रस्ताव तयार झाले. त्याला मान्यता मिळून काही कामांना सुरूवात सुध्दा झाली. सिडको वसाहतीच्या हस्तांतरणाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र नोडल एजन्सी असलेल्या सिडकोने सर्व पायाभूत सुविधा विकसीत तसेच सुस्थितीत करून दिल्याशिवाय कळंबोली नोड तरी वर्ग करण्यात येवू नये अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील, अमर पाटील तसेच शहराध्यक्ष रवीनाथ पाटील, प्रशांत रणवरे यांनी केली होती. याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला होता. त्याची दखल सिडकोने घेतली आहे. त्याचबरोबर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उर्वरीत आणि प्रलंबीत कामांचा आढावा घेवून ते पूर्ण करून देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार अधीक्षक अभियंता सिताराम रोकडे आणि कार्यकारी अभियंता गिरीष रघुवंशी यांनी आराखडा तयार करून तो प्रशासकिय मंजुरीकरीता वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर एजन्सी नियुक्त करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
ही कामे होणार
उघडे असलेले पावसाळी गटारे झाकले जाणार. कळंबोलीतील उदयानांची दुरूस्थी करून त्याचे सुशोभिकरण, रस्ते खड्डेमुक्त करून देणार. त्याचबरोबर कळंबोलीकरांच्या चालण्याकरीता पदपथांची दुरूस्ती करून दिली जाणार आहेत.
कोट-
कळंबोली वसाहतीतील सर्व दुरूस्थीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार आम्ही सर्व्हे केला त्यानंतर इस्टिमेट तयार केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. – गिरीष रघुवंशी, कार्यकारी अभियंता
कोट-
या कामांकरीता सिडकोकडे आम्ही वारंवार पाठपुरावा करीत होतो. मात्र आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रलंबीत कामांना वेग आला. कळंबोलीत कोटयावधी रूपयास विकास कामे हाती घेण्यात आले आहेत. कळंबोलीकरांनी खऱ्या अर्थाने दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे.
– प्रशांत रणवरे, युवा कार्यकर्ते, भाजप-कळंबोली