नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीमधून निवडणूक लढविण्यासाठी प्रियंका गांधी यांनी माघार घेतली. मात्र या माघारीची नवनवीन कारणे समोर येत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी प्रियंका यांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शविला होता. मात्र येथील राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती पाहिल्यास प्रियंका यांच्या माघारीचे कारण वेगळेच असल्याचे स्पष्ट होत आहे.
उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे. त्यामुळे प्रत्येक सभेत भाजपकडून सर्व जागांवर नरेंद्र मोदीच उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या आगमणाने उत्तर प्रदेशातील लढाई त्रिकोणी झाल्याचे चित्र आहे. याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे.
वाराणसीच्या कक्षेत उत्तर प्रदेशातील २६ आणि बिहारमधील ६ जागा येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवून या ३२ जागांवर लक्ष ठेवतात. २०१४ मध्ये भाजपने ही चाल खेळली होती. त्यावेळी भाजपला ३२ पैकी ३१ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी जातीच्या समीकरणांमुळे भाजपसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच प्रियंका यांनी येथून निवडणूक लढवली असती तर सहाजिकच काँग्रेसचे ३२ जागांवरील वर्चस्व वाढले असते. मात्र बसपा आणि सपाच्या मतांमध्ये विभाजन झाले असते. याचा फायदा भाजपलाच मिळाणार होता. या ३२ पैकी काही जागांवर काँग्रेस मजबूत असून येथील उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. भाजपला होणारा फायदा पाहता प्रियंका यांनी माघार घेतली. त्यामुळे प्रियंका यांची माघार भाजपसाठी नुकसान करणारी असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
दरम्यान वाराणसी मतदार संघातून निवडणुकीच्या रणांगणात प्रियंका यांना न उतरविण्याची योजना किती यशस्वी होणार हे येणारा काळच सांगणार आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या २०२२ मधील विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली हे देखील तेवढंच खर आहे.