पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल : ना. रविंद्र चव्हाण
राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
पनवेल : आपला देश तरुणांचा देश आहे, त्या अनुषंगाने तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी भाजप सरकार काम करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल होत आहे, असे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज (दि. ०८) खांदा कॉलनी येथे केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगार व सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या ‘भव्य रोजगार मेळावा २०१९’ चे उदघाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याला उमेदवारांनी तुफान प्रतिसाद दिला.
नामदार चव्हाण पुढे म्हणाले कि, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रात आदर्श काम करण्याबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय कार्य करत आहेत. आज त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा फायदा तरुणांना होणार आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हा उपक्रम कौतुकास पात्र आहे. आपला देश कृषिप्रधान असला तरी देशाला सुजलाम सुफलाम बनविण्याची ताकद तरुणांमध्ये आहे, त्यामुळे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष देऊन योजना आखल्या आहेत. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया असे महत्वकांक्षी योजना देशाच्या प्रगतीत हातभर लावत आहेत. या उद्देशातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. रोजगार, नोकरी करत असताना ‘मी नोकरी देणारा होणार’ हि मनात इच्छा आणि संकल्प करा असे सांगतानाच रोजगाराच्या संधी बरोबर शेतीसाठी संधी आहेत, त्यासाठी सरकारच्या प्रत्येक योजनेत सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारी काम आणि थोडा वेळ थांब अशी परिस्थिती पूर्वीच्या सरकारची परिस्थिती होती, मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झाल्यापासून सरकारी काम डिजिटलच्या दिशेने वाटचाल करून गतिमान झाले असल्याचा उल्लेखही नामदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी आवर्जून केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, आपण वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवितो. प्रत्येक दिवस कार्यक्रम असतात पण तरुणाच्या हाताला काम देणे हे सर्वात मोठे काम असल्याचे आवर्जून नमूद केले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात काम करताना रोजगार हा महत्वाचा प्रश्न असतो, तो या मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सोडविला जात आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हि आपली नेहमीच धडपड असते, त्या अनुषंगाने सरकारने रोजगाराच्या दृष्टिकोनातून वेग पकडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार धडाडीने काम करीत आहे व यामध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार सक्रियतेने काम करीत असल्याचा उल्लेख करून तरुणांनी रोजगार, नोकरी करण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेत राहावे, असा मार्गदर्शक सल्लाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला दिला.
सिडकोचे अध्यक्ष व मेळाव्याचे आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात, कोणताही मोबदला न घेता गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून हा १५ वा रोजगार मेळावा असल्याचे सांगून आजपर्यंत ७६८० जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला असल्याचे सांगितले. देशातील तरुण सुसुक्षित आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी स्किल इंडिया कार्यक्रमावर भर देण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी मानून मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. विमानतळ, जेएनपीटी एसईझेड व असे इतर प्रकल्प येथे कार्यन्वित होणार आहेत, त्यामुळे परिसराचा झपाट्याने विकास होऊन लाखाच्या संख्येने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले आहे, त्या अनुषंगाने आपल्या शैक्षणिक कार्यक्षमतेच्या अनुरूप रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी तरुणांनी जागरूक राहिले पाहिजे, असे सांगून त्यांनी मेळाव्यातील उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याच्या उदघाटन सोहळ्यास मेळाव्याचे आयोजक व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेवक नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, अमर पाटील, नगरसेविका सीता पाटील, सुशिला घरत, कुसुम पाटील, वृषाली वाघमारे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, प्राचार्य वसंत ब-हाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण, पदवीधर, अभियंता, व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकऱ्यांच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सागर माने, ऍड. चेतन जाधव, चिन्मय समेळ, मयुरेश नेतकर, सीकेटी महाविद्यालय आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.