मुंबई – खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली आहे. तसेच दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रदेश कोर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरही चर्चा होत आहे.
लोकसभा निवडणुकीसह राज्यातल्या पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही दानवे यांच्या नेतृत्वात पक्षाला चांगले यश मिळाले. त्यामुळे भाजपला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाजलेल्या नेत्यांची आवश्यकता नाही, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ गोटात आहे. त्यामुळे केवळ पक्ष संघटना मजबूत ठेवू शकेल, अशा ग्रामीण चेहऱ्याची निवड भाजप करू शकते. त्यामुळेच मराठवाड्यातीलसुजितसिंह ठाकूर, पश्चिम महाराष्ट्रातील सुरेश हाळवणकर आणि विदर्भातील संजय कुटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कुटे आणि हाळवणकर हे मंत्री पदाच्या आशेवर होते. मात्र, आता शेवटच्या कार्यकाळात त्यांना मंत्री करणे शक्य नसल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी असा पक्षात मतप्रवाह आहे. तसेच सुजितसिंह ठाकूर आणि हाळवणकर यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. आता अमित शाह काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे.