स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : संपूर्ण नवी मुंबईत विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. तासनतास वीज खंडीत होते. नागरिकांच्या तक्रारींचे फोन अधिकारी उचलत नाहीत.. महावितरणच्या अधिकार्यांचा निष्काळजीपणा असाच सुरु राहिला तर त्यांच्याविरोधात प्रत्येक विभागीय वीज कार्यालयासमोर जळजळीत तीव्र जनआंदोलन छेडू, असा निर्वाणीचा आणि सणसणीत इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.
आमदार नाईक यांनी सोमवारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसह महावितरण कंपनीचे अधिक्षक-अभियंता राजेश नाईक यांची भेट घेतली. यापूर्वी देखील आमदार नाईक यांनी वेळोवेळी वीज अधिकार्यांच्या भेटी घेवून वीज समस्या मांडल्या आहेत. पावसाळापूर्व वीजेची कामे वेळेवर होण्यासाठी प्रत्येक वर्षी ते वीज अधिकार्यांना भेटी देत असतात. घणसोली आणि कोपरखैरणे भागात
सोळा-सोळा तास वीज गायब होते. सध्या उष्णतेची लाट असल्याने वीज खंडीत झाल्यानंतर नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, नवजात बालके, रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण यांना प्रचंड त्रास होत असतो, ही बाब आमदार नाईक यांनी लक्षात आणून दिली. काल रविवारी घणसोली येथे केबलचे काम होत असताना एका बालीकेला वीजेचा धक्का लागून ती गंभीर जखमी झाली आहे. परंतु महावितरणने केवळ २०हजाराची तातडीची मदत केली आहे. या बालिकेच्या उपचाराचा खर्च लाखाच्या वर असून तीला महावितरणने अधिकची आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. वीजेच्या धक्क्याने जखमी नागरिकांना लोकप्रतिनिधी मदत करीत असतात मात्र वीज अधिकारी कानाडोळा करतात, या बददल आमदार नाईक यांनी वीज अधिकार्यांना बैठकीत सुनावले. केबल जळतात, फिडर ट्रीप होतात, वीजेचे पोल गंजलेले आहेत, डिपी उघडया आहेत, सबस्टेशनची दुरवस्था झाली आहे, ट्रान्सफार्मर जळतात, दुरुस्तीसाठी सर्व्हिस केबल, साहित्य, उपकरणे उपलब्ध नसतात, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे दुरध्वनी अधिकारी उचलत नाहीत अशा अनेक समस्यांचा पाढाच ऐरोली, दिघा, तळवली, गोठिवली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, कोपरी, वाशी, आडिवली-भुतवली इत्यादी भागातील लोकप्रतिनिधीं आणि नागरिकांनी वाचला. त्यावर आपण सर्व विभागीय अधिकार्यांची बैठक घेवून त्यांना आवश्यक वीज साधणांची आणि उपकरणांची पुर्तता करण्याची मागणी अधिक्षक-अभियंता नाईक यांना आमदार नाईक यांनी केली. पावसाळयात वीज पुरवठयाची परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास त्याला महावितरणचे अधिकारीच जबाबदार असतील, असे बजावून अधिकार्यांनी कारभारात सुधारणा केली नाही तर त्यांना यापुढे मागण्यांचे निवेदन नाही तर त्यांच्याविरोधात लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडू, असा इशारा दिला. अधिक्षक-अभियंत्यांना भेटल्यानंतर आमदार नाईक यांनी घणसोलीत विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या बालिकेची रुग्णालयात भेट घेवून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली.
अवतरण…
मंत्री महोदयांना भेटून तसेच विधानसभेत विषय मांडून महावितरणसाठी निधी मिळविण्याकरिता माझा पाठपुरावा सुरु असतो. परंतु निधी मंजूर होवूनही कामे सुरु नाहीत, असे दिसते. दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध नसते निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जातात. यापुढे वीजेचा धक्का लागून घणसोलीत बालिका जखमी झाल्यासारखी जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची असेल.
– संदीप नाईक, आमदार
चौकट..
आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नातुन कोपरखैरणे येथील माथाडी वसाहतीसाठी वीजेचे वॉल बॉक्स मंजूर झाले असून ते त्वरीत बसवावेत. तसेच आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे तळवली येथे सब स्टेशनसाठी सिडकोकडून महावितरणला भुखंड हस्तांतरित करण्यात आलेला आहे. या भुखंडावर सब स्टेशनचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.