स्वयंम न्युज ब्युरो
मुंबई : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी यंदा संपूर्ण राज्यभरात साजरी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.
यंदा १४ जुलै रोजी स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात मोठा संघर्ष केला. राजकारण, समाजकारणासह, सिंचन, शिक्षण, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिली आहे. जायकवाडी धरणाची उभारणी करून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यात ते आघाडीवर होते. या पार्श्वभूमीवर स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे करणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. यानिमित्त राज्यभरात अनेक सामाजिक व उद्बोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्री पद व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदही भूषवलेले असल्याने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष शासकीय पातळीवरही साजरे करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने सरकारकडे केली आहे असे शिंदे म्हणाले.