* पावसाळी अधिवेशनात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी
नवी मुंबई : महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी होय. मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ब्राह्मण, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी आहे. मावळ तालुक्यातील वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, पुरातनकालीन एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. आगरी-कोळ्यांच्या आराध्य दैवत व नवसाला पावणारी आई एकविरा मातेचे मंदिर वसलेले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील कार्ला लेणी. या लेण्यांमध्ये ऐश्वर्य आहे, मात्र त्यात डामडौल नसून अभिजात कला आहे. पर्यटन व वर्षाविहारासाठी नावलौकिक असलेल्या लोणावळ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे. पुणे-मुंबई या महानगरांच्या मध्यभागी वसलेली कार्ला लेणी आणि एकवीरा मातेचे मंदिर म्हणजे विपुल निसर्गसंपदा, प्राचीन लेणी, गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे आहे असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापासून सर्व जाती धर्माचे लोक, लोकप्रतिनिधी, भाविक भक्त दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी श्रद्धेने येत असतात परंतु पायथ्यापासून ते गडापर्यंत पायर्यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था, गडाच्या पायथ्याशी वाहनतळ, स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वातानुकूलित दर्शनरांगा, दर्शनरांगेत लहान मुलांना व वृद्धांना बसण्याची व्यवस्था, तसेच पायथ्यापासून गडापर्यंत असलेल्या पायर्यांची दुरावस्था असल्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळणे, पाय निसटून पडणे अश्या दुर्घटना होत असतात. याच अनुषंगाने आगरी-कोळी भाविक भक्तांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे तसेच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देऊन शासनास सदरचे काम लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी केली आहे.