* स्थायी समितीच्या बैठकीत गर्भवतींच्या मुद्यावर नगरसेविका सौ. पूनम मिथून पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल
* आरोग्य विभागाकडे निधी नसेल तर नगरसेवक निधी वापरण्याची नगरसेविका सौ. पूनम मिथून पाटलांची मागणी
* महापालिकेच्या उदासिनतेमुळे गर्भवती महिलांना करावा लागतोय समस्यांचा सामना
नवी मुंबई : काही वर्षापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापतीपद सक्षमपणे भूषविलेल्या बेलापुर गावच्या नगरसेविका सौ. पूनम मिथुन पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर टीका करत त्यांच्या अकार्यक्षमतेचे, गलथान कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर आणली. केंद्र व राज्य सरकारपातळीवर सातत्याने विविध पुरस्कारांचे मानकरी ठरणार्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग म्हणजे ‘बडा घर आणि पोकळ वासा’ असून रूग्णांच्या जिविताशी खेळत असल्याचा प्रकार नगरसेविका सौ. पूनम मिथून पाटील यांच्यामुळे उजेडात आला.
महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून शहरातील गरोदर महिलांची छळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करीत ‘काँग्रेस’च्या सदस्या सौ. पुनम पाटील यांनी स्थायी समिती बैठकीत आरोग्य सेवाची लक्तरे काढली. महापालिकाला आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी भिकेचे डोहाळे लागले असतील तर आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नगरसेवक निधी वापरावा, असेही नगरसेविका सौ. पुनम मिथून पाटील यांनी महापालिका आरोग्य विभागाकडून रुग्णालयांमध्ये रुग्णांना दिल्या जाणार्या सुविधांबाबत तसेच महापालिका रुग्णालयांमधील डॉक्टर्सची अपुरी संख्या, विविध तपासण्या आणि ओषधांची कमतरता या मुद्यांवर सर्वपक्षीय सदस्यांनी आरोग्य समिती, स्थायी समितीसह महासभेत चर्चा करुन महापालिकाची आरोग्य सेवा सुधारण्याची मागणी सातत्याने केली आहे. परंतु, महापालिकाची आरोग्य सेवा नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. सभागृहामध्ये सदस्यांनी आरोग्य सेवा सुधारण्याबाबत केलेल्या मागणीकडे आरोग्य विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.
केद्र शासनाच्या योजनामधून सन-1996 मध्ये ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरुळ या ठिकाणी माताबाल रुग्णालय सुरु करण्यात आली आहेत. सुरुवातीपासूनच या माताबाल रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांना देण्यात येणार्या सुविधांची वानवा सुरू आहे. केंद्र सरकारच्या मदतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या 4 माताबाल रुग्णालयांसोबतच जिल्हा परिषदच्या वतीने बेलापूर येथे सुरु असलेले माताबाल रुग्णालय महापालिकाकडे हस्तांतरीत करण्यात आले खरे; पण बेलापूर येथील रुग्णालय हस्तांतरीत झाल्यानंतर या ठिकाणी गरोदर महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा बेलापूर परिसरातील आग्रोळी, दिवाळे, फणसपाडा आदी गावातील नागरिकांना होती. परंतु, गेल्या 20 वर्षापासून नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे सौ. पुनम मिथून पाटील म्हणाल्या.
महापालिकाने बेलापूर येथील माताबाल रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करुन गेल्या 4 वर्षापूर्वी 100 बेडची हॉस्पिटल वास्तू उभारली. याठिकाणी फक्त माताबाल रुग्ण सेवा सुरू ठेवली आहे. त्यामुळे उपचारासाठी येणार्या गरोदर महिलांची संख्या पाहता त्या तुलनेने येथे रुग्णालयात देण्यात येणार्या सेवा आणि सुविधा अपूर्ण पडत आहेत. या रुग्णालयात गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्याची व्यवस्था कधीच उपयोगी पडलेली नसून ती नेहमीच बंद असते. त्यामुळे गरोदर महिलांना नेरुळ किंवा वाशी येथील रुग्णालयात जावे लागते. पण, गरोदरपणात महिलांना प्रवास करणे शक्य नसताना बस किंवा रिक्षाने त्यांना उपचारासाठी प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेक वेळा सभागृहात ठराव मांडून तसेच प्रशासनाशी पत्रव्यहार करून बेलापुर येथील रुग्णालयात सार्वजनिक आणि बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. पण, त्याकडे महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज याठिकाणी गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप नगरसेविका सौ. पुनम मिथून पाटील यांनी स्थायी समिती बेठकीत केला .
सीसीटिव्हीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करणार्या महापालिकाला साधे गर्भवती काळात महिलांची थायरॉईड तपासणी करण्याची सुविधा माता-बाल रुग्णालयात देता येत नसल्याची खंतही सौ. पुनम मिथून पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात सार्वजनिक
आरोग्य सेवासह गर्भवती महिलांच्या उपचारांसाठी लागणार्या सर्व सुविधा लवकरच पुरविण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी सभागृहात सांगितले.