मुंबई :गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली पावसाची प्रतिक्षा संपली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात सकाळपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मुंबईतल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर सुखावला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, दादर, घाटकोपर, मुलूंड,चर्चगेट अशा पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस सुरु आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण, नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही जुलै महिना अखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांवरही पाणीटंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे पावसाने लावलेली ही हजेरी काहीप्रमाणात का होईना पण मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.
पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची चिंता मिटली आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागातही पावसाने हजेरी लावली आहे. गुहागर ,चिपळूण ,खेड परिसरात रात्रभर पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा शेतकरी आनंदात आहे. नद्या-नाल्यांमध्ये पाणी भरु लागलं आहे.
मुंबईत शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस राहणार आहे असा अंदाज स्कायमेटने दिला आहे.
मुंबईत मान्सूनने शेवटी गती घेतली आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर असलेली ट्रफ व बंगालच्या पूर्व-मध्य खाडीवर उपस्थित चक्रवाती प्रणालीला या पावसाचे श्रेय दिले जाऊ शकते. स्कायमेट हवामानानुसार, २८ जून रोजी पाऊस तीव्र होईल आणि २९ जून रोजी जोरदार पाऊस पडेल. ३० जूनला कमी होईल परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहील. जून महिन्यात शहरात सरासरी पाऊस ४९३.१ मिमी इतका आहे. आतापर्यंत शहरात केवळ १८३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तथापि, जुलै मध्ये चांगल्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे आणि पाऊस महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला जोर पकडेल, असे दिसून येत आहे.
तसेच पुढील २४ तासांत मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि नागपूर आदी ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.