सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
- बंद न ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा
- भगत-आवटी वादात व्यापाऱ्यांचे नुकसान कशाला
- तुमच्यातील वादात जनतेला भरडता कशाला
नवी मुंबई : कॉंग्रेसमधून वर्षानुवर्षे राहून मागील निवडणूकीत शिवसेनेत आलेले नगरसेवक नामदेव भगत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व त्यानंतर मागील पालिका निवडणूकीत शिवसेनेत प्रवेश केलेले रंगनाथ औटी यांच्यातील ‘कानशील’ प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठांसमोर हा प्रकार होवून कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रकार सुरू असल्याने ‘कानशील’ प्रकरणाने नेरूळमधील पुणेरी समाज शिवसेनेच्या वरिष्ठांच्या बोटचेपेपणाच्या भूमिकेवर कमालीचा संताप व्यक्त करत आहे. त्यातच रंगनाथ औटी समर्थकांनी नेरूळ-जुईनगर सोमवारी बंद ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्याने व्यापारी वर्गाकडून व स्थानिक रहीवाशांकडून उघडपणे संताप व्यक्त केला जावू लागला आहे.
सोमवारी नेरूळ व जुईनगर बंद ठेवण्याच्या हालचाली शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी समर्थकांनी सुरू केल्याने त्यास प्रत्युत्तर देण्याची भाषा आता व्यापारी वर्गाकडून उघडपणे केली जात आहे. वेळ पडल्यास कोणी बंद करण्यास दहशतीचा वापर केल्यास नेरूळ पोलिसांना तात्काळ संपर्क करण्याच्या व १०० क्रमाकांवर संपर्क करण्याच्या सूचनाही व्यापारी वर्गाकडून परस्परांना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेतील हा अंर्तगत वाद असून त्याची झळ व्यापाऱ्यांनी व जनतेने का सोसायची असा प्रश्न आता रहीवाशांकडून व व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.
गोड असताना एकत्र गळ्यात गळे घालून फिरता आणि कानशीलात बसेपर्यत संबंध फाटल्यावर जनतेला व व्यापाऱ्यांना का वेठीस धरायचे असा प्रश्न व्यापारी व रहीवाशांकडून विचारला जात आहे. मांडवेंच्या वार्डात काही लोकांना जाणिवपूर्वक जुईनगर व नेरूळ गावातील शिवसेना लोकांकडूनच मदत केली जात असल्याचे आम्ही जवळून पाहिल्याचे व आता त्यांच्यातच जुंपल्याचे व्यापाऱ्यांकडून व रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी बंद न ठेवण्याचा निर्धार केला असून त्यासाठी त्यांनी इतर राजकीय घटकांशीही संपर्क साधला असून त्यांनीही आपण व्यापाऱ्यांच्या व रहीवाशांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.
रंगनाथ औटी व नामदेव भगत यांच्यातील गाजलेले व बहूचर्चित ‘कानशील’ प्रकरणी बंद ठेवून व्यापारी व रहीवाशांना वेठीस धरण्याचा उद्योग झाल्यास दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणूकीत त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
दरम्यान शिवसेनेतील वादामुळे काही घटकांनी सुरू केलेल्या नेरूळ-जुईनगर बंद ठेवण्याच्या हालचालींना कॉंग्रेसचे नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी बंद ठेवण्याचा कोणी प्रकार केल्यास आपण व्यापारी वर्गाच्या संरक्षणासाठी व स्थानिक जनतेचे होणारे हाल टाळण्यासाठी रस्त्यावर उतरून हा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा दिला आहे. पक्षातील वाद पक्षात मिटवावे, त्याची झळ सामान्य जनतेला नसली तर कॉंग्रेस ते कदापि सहन करणार नाही असा इशारा देत कायदा व सुव्यवस्थेसाठी कॉंग्रेस पक्ष नेरूळ पोलिसांना सहकार्य करणार असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली,.
नेरूळ व जुईनगर बंद ठेवण्याच्या वृत्ताचा जुईनगरमधील शिवसेनेचे युवा नगरसेवक विशाल ससाणे यांनी इनकार करत शिवसेना नगरसेवकाची व पक्षसंघटनेची बदनामी करण्यासाठी हा खोडसाळपणा करत असल्याचे सांगितले. शिवसेनेतील दोन नगरसेवकांच्या आपसातील वादामुळे जुईनगर आणि परिसरात बंद करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती.मात्र राजकीय विरोधक खोडसाळ प्रचार करून याबाबत नाहक अपप्रचार करत असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक विशाल ससाणे यांनी केला आहे. व्यापारी संघटनांशी चर्चा करून कुठलाही बंद ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.हा पक्षांर्तगत मामला असून याबाबत येत्या ७ दिवसात निर्णय होईल. मात्र यासाठी बंद ठेवण्याची गरज नसल्याने जुई नगर आणि परिसर सुरळीत सुरू राहणार असून रंगनाथ औटी यांनी या भूमिकेला पाठींबा दिला असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले आहे. रंगनाथ औटी यांच्याशी घडलेल्या प्रकाराने नेरूळ व जुईनगरमधील पश्चिम महाराष्ट्रातील समाज संतप्त झाला असून याप्रकरणी शिवसेनेच्या वरिष्ठांनी योग्य निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत योग्य तो विचार करण्याची संतप्त भाषा या लोकांकडून उघडपणे वापरली जावू लागली आहे.