मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना वाढवण्याचं काम मी करणार आहे. मला असंख्य कार्यकर्त्यांचा फोन येत आहे.
आम्हाला पक्ष फोडायचा नाही, तर पक्ष वाढवायचा आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंच्या कामानं मी प्रभावित झाल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्या जागेवरून कोणाला लढवलं पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर यांनी सांगितले होते.
तसेच राजकारणात कधीतरी काही निर्णय घ्यावे लागतात, ते चूक की बरोबर सांगता येत नाही. राष्ट्रवादी सोडताना फार आनंदी नाही, पण काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. उद्धव ठाकरे, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे, असे सचिन अहिर म्हणाले आहेत.