स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
जनतेच्या मनात काँग्रेसच आहे.
नवी मुंबईच्या ऐरोली येथे काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न
नवी मुंबई : भाजप शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. सरकार खोट्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल करत आहे. सरकारचे अपयश लोकांपुढे मांडून, जोमाने कामाला लागा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ते नवी मुंबईच्या ऐरोली येथे काँग्रेसच्या कोकण विभागीय आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. हुस्नबानु खलिफे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक, ठाणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज शिंदे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप, पनवेल काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, रमेश किर, रामकिशन ओझा, सुभाष कानडे, यशवंत हप्पे,गजानन देसाई, शाह आलम, सचिव सुधीर पवार, आबा दळवी, संतोष शेट्टी, तारिक फारुकी, के.वृषाली यांच्यासह प्रदेश काँग्रेस, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित हेते.
यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, भाजप शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकरी, कष्टकरी, तरूण, महिला, व्यापारी, दलित, अल्पसंख्यांक अशा सर्वच घटकांची फसवणूक या सरकारने केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यामुळे धर्मांध शक्ती समाजात अशांतता निर्माण कऱण्याचा प्रयत्न करत आहेत. फुले, शाहू, आंबेकरांच्या महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विखारी विचार पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो हाणून पाडण्यासाठी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तळागाळापर्यंत पोहोचवा. सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा. जनता आजही काँग्रेससोबतच आहे. नऊशेपेक्षा जास्त इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने आपले बुथ मजबूत करावे आणि गटतट सोडून जोमाने कामाला लागावे. राज्यात नक्कीच काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
ऐरोली येथील म्हात्रे सभागृहात झालेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नवी मुंबई, रायगड, पनवेल, ठाणे शहर, मिरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, व भिवंडी काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला व सूचना केल्या.