स्वयंम न्युज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ९ वर्षांहून अधिक काळ मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि पाच वर्षे मंत्री राहिलेल्या सचिन अहिर यांनी आज अचानक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्यासाठी राष्ट्रवादीने निर्णय घेतला आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांती दिनी अहिर यांच्या बालेकिल्यातच असलेल्या जांभोरी मैदानावर मुंबईतील कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केला जाणार असून याला हजारो कार्यकर्ते जमवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या मेळाव्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी ष्णमुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचेही आयोजन केले जाणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. अहिर यांचा सेनेत प्रवेश झाल्याने त्यासाठी वरळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे येऊन अहिर यांच्यासोबत एकही पदाधिकारी गेला नसल्याचे स्पष्ट केले. ‘त्यांनी सर्व काही मिळूनही माती खाल्ली. यामुळे त्यांनी पळ काढला. तसेच अहिर गेल्यामुळे मुंबईत प्रचंड मोठ्या जोमाने आपण कामाला लागणार असल्याचेही स्पष्ट केले. विधानसभेला हार होईल म्हणून त्यांनी पळ काढला, हे आम्हाला पटले नाही. मात्र, त्यांच्या जाण्याचे आम्ही आणि राष्ट्रवादीचा एकही निष्ठावंत कार्यकर्ता खचला नाही, त्यामुळेच आम्ही क्रांती दिनाच्या दिवशी, 10 हजारांहून अधिक जण वरळीतील जांबोरी मैदानाच्या रस्त्यावर उतरलेले दिसतील आणि मोठ्या ताकदीने हा कार्यक्रम करून राष्ट्रवादीची ताकद दाखवली जाईल,’ असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
आत्तापर्यंत सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असल्याचे सांगत होते, आज त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाचा उल्लेख केला असला तरी त्यांना कोणाच्याही स्वप्न आणि विचारांसाठी काहीही देणे-घेणे नाही. केवळ त्यांचा स्वत:चा स्वार्थ असल्याने त्यांनी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नसल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले.