स्वयंम न्यूज ब्युरो :navimumbailive.com@gmail.com
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणीही झाली नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नेते मतांचा जोगवा मागण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करावा. म्हणजे त्यांना जमिनीवरचे जळजळीत वास्तव दिसेल, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. भाजप शिवसेना सरकारच्या काळात १५ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जुलै महिना संपत आला तरी राज्याच्या बहुतांश भागात अद्याप पेरणी झाली नाही. जिथे थोडीफार पेरणी झाली होती तिथली पीके वाळू लागल्याने दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. हा दुष्काळाचा तेरावा महिना आहे. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून सरकारची अवस्था नियंत्रण सुटलेल्या जहाजासारखी झाली आहे. पाऊस लवकर पाडावा अशी अपेक्षा करण्यापलिकडे सरकार काहीही करत नाही. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेल्यातच जमा आहे. निसर्गाची अवकृपा व सरकारची अनास्था अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्याला मदत करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष यात्रा आणि इव्हेंटबाजी करून राज्यातील शेतक-यांची क्रूर थट्टा करत आहेत. याची शिक्षा जनता त्यांना निवडणुकीत देईल असे सावंत म्हणाले.