सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या स्थापनेपासूनच कंत्राटी व ठोक मानधन या दोन शब्दांचे गालबोट लागले आहे, त्यातून अजून महापालिका प्रशासनाची सुटका झालेली नाही. कंत्राटी सेवेचे निर्मूलन करण्यात यावे असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे निर्देश असतानाही महापालिका प्रशासनात आजही कंत्राटी व ठोक मानधन ही संकल्पना पहावयास मिळत आहे. आज नवी मुंबई महापालिका प्रशासनात सुमारे ५७५ कामगार ठोक मानधनावर काम करत आहेत. दरवेळी ६ महिने त्यांच्या कामाचे पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा नवीन ऑर्डर देण्यात येते. मुळातच पालिका प्रशासनाने या ठोक मानधनावरील कामगारांच्या सेवेचे कायम सेवेत रूपांतर करणे आवश्यक असल्याचे इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
या कामगारांनी महापालिका प्रशासनात ८ ते १२ वर्षे काम केले आहे. दुसरीकडे काम करण्याची वयोमर्यादाही संपुष्ठात आलेली आहे. या कामगारांना महापालिका प्रशासनाकडून कोणतीही आरोग्य सुविधा मिळत नसून त्यांचा आरोग्य विमा पालिका प्रशासनाने काढणे आवश्यक आहे. ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची ऑर्डर संपून १० दिवसाचा कालावधी लोटला तरी कामगारांना नवीन ऑर्डर भेटलेली नाही. या कामगारांच्या कायम सेवेबाबत इंटकच्या वतीने रवींद्र सावंत यांनी साकडे घालत असून याप्रकरणी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना योग्य त्या प्रकारचे निर्देश देण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.