मनसेचा कडवट राजसमर्थक असलेले निलेश बाणखिलें ऐरोलीच्या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवी मुंबईने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. भाजपचे मातब्बर नेते गणेश नाईकांचे बेलापुरमधून तिकिट कापले जाणे, संदीप नाईकांनी स्वत:चे तिकिट गणेश नाईकांना देणे, अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या हालचाली, ठाण्याच्या शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून नवी मुंबईतील नाराजांना रसद मिळू लागल्याने त्यांचे वाढलेले मनोधैर्यामुळे नवी मुंबईतील राजकीय घडामोडींनी रंगतदार वळण घेतले आहे. ऐरोलीमधून मनसेने मराठा समाजाच्या निलेश बाणखिले या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिल्याने ऐरोलीतील लढत आणखीनच रंगतदार होणार आहे.
निलेश बाणखिले हे गेल्या काही वर्षापासून ऐरोली नोडमधील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व आहे. मनसे स्थापनेपासून सक्रिय असलेला मराठा समाजाचा आक्रमक युवा चेहरा ही निलेश बाणखिलेची ओळख ऐरोलीच्या मतदारसंघातील राजकीय समीकरणात उलथापालथ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऐरोली मतदारसंघात पुण्याची असलेली लोकसंख्या व निलेश बाणखिलेंची मंचरकर ही प्रतिमा, त्यातच मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व, यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील घटकांमध्ये बाणखिलेंच्या उमेदवारीचे आकर्षण वाढीस लागले आहे.
ऐरोली, घणसोली, कोपरखैराणे भागात पश्चिम महाराष्ट्रातील लोकवस्ती लक्षणीय असून शिवसेनेला नवी मुंबईत मतदारसंघ न मिळाल्याने शिवसैनिकांत नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कोणताही अपक्ष उमेदवार उभा न राहील्यास शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी मनसेच्या निलेश बाणखिलेंच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजार समिती आवाराशी बाणखिलेंची जवळीक असून ऐरोली विधानसभा मतदारसंघात बाजार समिती घटकांचे निवासी वास्तव्यही प्रभावी आहे. निलेश बाणखिले ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ऐरोली मतदारसंघात खरी लढत भाजप उमेदवार गणेश नाईक व मनसेच्या निलेश बाणखिलेंमध्येच होण्याची शक्यता पहिल्याच टप्प्यात व्यक्त केली जात आहे.