सारसोळे गावच्या शांतीधाम स्मशानभूमीत ठेकेदाराकडून सुरू असलेले निकृष्ठ दर्जाचे काम दाखविताना सारसोळे गावचे विकासपर्व मनोज मेहेर
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीतील संथ गतीने सुरू असलेल्या निकृष्ठ कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी लेखी तक्रारपत्रातून महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
या समस्येबाबत मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाला २१ ऑगस्ट २०१९ रोजी लेखी निवेदन सादर करूनही आपणाकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. आजही काम निकृष्ठ दर्जाचेच असून संथ गतीने सुरू आहे. आपणाकडून ठेकेदाराला अभय देण्यामागे कोणते गणित असेल तर ते तुम्हालाच लखलाभ असो. दीड महिन्यात स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ही स्मशानभूमी प्रामुख्याने सारसोळे ग्रामस्थांची असून सारसोळे ग्रामस्थांनी मनाचा मोठेपणा दाखवून अन्य लोकांच्या अंत्यविधीला कधीही आडकाठी घेतलेली नाही. सभोवतालच्या स्मशानभूमीत जावून सुरु असलेल्या प्रकाराची माहिती घेतल्यास सारसोळे ग्रामस्थांच्या मनाचा मोठेपणा आपल्या निदर्शनास येईल. या स्मशानभूमीत पाच ठिकाणी एकाच वेळी अंत्यसंस्काराची सुविधा आहे. त्यातील दोन सारसोळे ग्रामस्थांसाठी राखीव आहे. त्यातील एक चौथरा काम सुरु असल्याने गेल्या काही महिन्यापासून बंदच आहे. काल सारसोळे गावातील दोन जणांचे निधन झाले. आज कॉलनीतील तीन जणांचे निधन झाले. नेरूळ पूर्व, पश्चिम, शिरवणे, जुईनगर येथून मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जात असल्याचे मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
स्मशानभूमीत अंत्यविधीच्या सुरु असलेल्या लोखंडी चौथऱ्याचे काम गलथान व निकृष्ठ दर्जाचे आहे. जुनेच लोखंडी चौथरे असून केवळ रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी चौथऱ्याच्या खालील बाजूस नवीन लोखंडी जाळी बसवून कामामध्ये थुंकपट्टी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मी २१ ऑगस्ट रोजी पत्रकारांसमवेत पाहणी अभियान राबवून कामातील गलथानपणा व निकृष्ठ दर्जाचे काम पत्रकारांच्याही निदर्शनास आणून दिले होते. त्याबाबत वर्तमानपत्रातही बातम्या आलेल्या आहे. स्मशानभूमीच्या कामातील संथपणा, दीड महिन्यात कामाची कोणतीही प्रगती नसणे, निकृष्ठ दर्जाचे काम असणे याबाबत २१ ऑगस्टला लेखी तक्रार सादर केली आहे. या घटनेला दीड महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. पालिका प्रशासन ठेकेदाराला व त्याच्याकडून होत असलेल्या निकृष्ठ कामाला पाठीशी घालत आहे. या तक्रारपत्रासोबत मी २१ ऑगस्टला सादर केलेल्या लेखी तक्रारीचीही प्रत जोडत आहे. तक्रारीची दखल घेवून निकृष्ठ कामाची दखल घेणे व संबंधित दोषी असलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत लवकरात लवकर टाकण्याची कारवाई करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.