नवी मुंबई – तुळशीचे रोप देऊन दसऱ्याला सानपाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. सानपाडा सेक्टर ८ येथील श्री गणेश मंदिर येथे गणेशाचे पूजन करून १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री.गजानन काळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनसेचे सानपाडा-पामबीच अध्यक्ष योगेश शामराव शेटे यांनी दिली. . दसऱ्याला सोन्याच्या रुपानं आपट्याची पानं देण्याची परंपरा आहे. यंदा आपल्या महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली होती. पूरस्थितीच्या झळा पोहोचत असतानाच, सण साजरे करतानाही इकोफ्रेंडली पर्याय शोधून काढणं गरजेचं होतं. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या सणाला आपट्याची पानं देऊन पर्यावरणाचा ऱ्हास करण्यापेक्षा, संदेशाच्या रुपानं सोनं देण्याकडे मनसेचा कल आहे. कुंभ कर्ण सारख्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सानपाडा विभागाच्या वतीने जनतेला घरोघरी जाऊन आपट्याच्या पानांऐवजी तुळशीचं रोपटं देऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’ ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ असा संदेश देत राज्य सरकारचा निषेध करत हा सण साजरा करण्यात येणार असल्याचे मनसेचे सानपाडा पामबीच विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सांगितले. तुळस ही बहुगुणी वनस्पती असल्यानं त्याचा उपयोग होईल. तुळशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुळशीची पानं उपयोगी ठरतील यात शंकाच नाही.