सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ / navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी आपली बंडखोरी कायम ठेवल्याने भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक गावडे आणि मनसेचे गजानन काळे यांच्यात बेलापुर मतदारसंघात चौरंगी लढत अटळ झाली आहे.
भाजपने आपल्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखवित त्यांना पुन्हा महायुतीच्या वतीने बेलापुर विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे. गणेश नाईक व त्यांचे समर्थक भाजपमय झाल्यावर पडझडीच्या वावटळीत अडकलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंसारखा मातब्बर मोहरा पणाला लावला आहे. मनसेकडून शहर अध्यक्ष गजानन काळेंना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेने बेलापुरच्या जागेसाठी आकांडतांडवर करूनही नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेले आहेत. तथापि नवी मुंबईतील शिवसेनेच्या अस्तित्वासाठी शहरप्रमुख विजय माने यांनी बंडखोरी करत शिवसैनिकांना दिलासा दिला आहे. वंचित बहूजन आघाडीचे नवी मुंबईप्रमुख विरेंद्र लगाडे यांच्याकडून वेळेचे ‘टायमिंग’ साध्य न झाल्याने त्यांना निवडणूकीचा अर्ज सादर करता आलेला नाही.
बेलापुर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत असली तरी प्रामुख्याने मुख्य लढत ही भाजपच्या सौ. मंदाताई म्हात्रे आणि राष्ट्रवादीच्या अशोक गावडे यांच्यातच आहे. सुरूवातीच्या काळात भाजपच्या मंदाताईं म्हात्रेंसाठी ही लढत एकतर्फी ठरणार असल्याची चर्चा असतानाच मागील ४८ तासात राजकीय वारे बदलू लागल्याने गावडे व मंदाताईंत ‘काटे की टक्कर’ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक रिंगणात नसणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. नवी मुंबईत एकही मतदारसंघ न मिळाल्याने नाराज शिवसैनिकांचे समर्थन विजय मानेंना मिळण्याची शक्यता आहे. गजानन काळे यांनी मागील जवळपास १० वर्षात केलेली मोर्चेबांधणी त्यांना कितपत मतदान मिळवून देणार आहे, यावरच गजानन काळेंचे शहरप्रमुखपदावरील भविष्य निश्चित करणार आहे. मंदाताई म्हात्रे यांनी ५ वर्षात विकासकामांसाठी केलेला पाठपुरावा आणि त्यांचा सततचा जनसंपर्क व परप्रातिंय मतदारांचा सर्वाधिक पाठिंबा या बाबी मंदाताईच्या पथ्यावर पडणार आहे.
मागील काही दिवसांपासून बेलापुर वधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला काही प्रमाणात बळकटी प्राप्त होवू लागली आहे. वंचितचे मतदान भाजपला होण्याची शक्यता नसल्याने ते मतदान अशोक गावडेंकडे झुकण्याची शक्यता आहे, वंचितचे मतदान फारसे भाजपला होत नसते. त्यामुळे आता भाजपला वंचितचे मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी तारेवरसची कसरत करावी लागणार आहे. गजानन काळे हे प्रसिध्दीमाध्यमातील चर्चेतील नाव असले तरी तो प्रकाशझोत आपणाकडील मतपेटीत वळविण्यात येणारे यशापयश गजानन काळेंच्या नेतृत्वाचे भविष्य ठरविणार आहे. बंडखोरी केलेले शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने माघार घेतील असे सर्वांना वाटत होते. परंतु त्यांनी उमेदवारी कायम ठेवत ‘बॅट’ हाती घेवून माने निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. ईटीसी प्रकरणातील वादामुळे नाहटा समर्थक विजय माने यांचे काम करण्याची शक्यता वाढली आहे.