राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
शिवसेना महानगर प्रमुख अँड. प्रथमेश सोमण, महिला आघाडी नेत्या सीमा मानकामे प्रचारात सहभागी
पनवेल: पनवेल विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांच्या प्रचाराचा नारळ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या हस्ते वाढविला. विशेष म्हणजे शिवसेनेचे महानगरप्रमुख संघटक, युवा नेते अँड. प्रथमेश सोमण आणि महिला आघाडीचे नेत्या सीमा मानकामे प्रचारात सहभागी झाल्या आहेत. ते या निवडणुकीत कडू यांची निशाणी असलेल्या शिट्टीचा प्रचार करणार आहेत.पनवेल विधानसभा मतदार संघातून प्रस्थापित पक्षांनी विकासाला खोडा घातल्याने विशेषतः भारतीय जनता पार्टी, शेकाप आघाडीवर नागरिकांची उघड नाराजी आहे. त्याचा फायदा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांना निश्चित मिळणार आहे. शिवाय कडू यांचा सामाजिक कार्यातून निर्माण झालेला दांडगा जनसंपर्क, अनेक आंदोलनातून शासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला दबदबा आणि यशस्वी आंदोलने यामुळे कडू यांच्या नावाला चांगलीच पसंती मिळत आहे. काही सामाजिक संस्था आणि मतदारांनी यंदा बदल हवा, पनवेलच्या विकासासाठी कांतीलाल कडू यांचा चेहरा नवा, अशी घोषणाबाजीही सोशल मीडियावरून करत भाजपा आणि शेकाप उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.त्यातच युती, आघाडी अतिशय बदनाम झाल्या आहेत. पक्षनिष्ठा, तत्व खुंटीला बांधून मतदारांना फसवून स्वार्थ साधणाऱ्यांवर या वेळी प्रचंड नाराजी फोफावली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी उलट्या बोंबा मारायला सुरुवात केल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उरणमध्ये आमदार मनोहर भोईर यांना आव्हान देणाऱ्या भाजपाच्या अपक्ष उमेदवाराला साथ देणाऱ्या प्रशांत ठाकूर यांचा आम्ही प्रचार करणार नाही, असा स्वाभिमान जागवत कट्टर शिवसैनिक युतीच्या उमेदवारापासून दूर राहिले आहेत. नेते विकले गेले तरी कट्टर शिवसैनिक कधीही विकला जात नाही, असे म्हणत अनेक जण अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू यांचा उघड प्रचार करण्यास पुढे सरसावले आहेत.आज सकाळी दुर्गामातेच्या मंदिरात कांतीलाल कडू यांनी दसऱ्याच्यानिमित्ताने दर्शन घेतले आणि त्यानंतर कडू यांच्या कार्यलयात डॉ. दवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कडू समर्थकांनी विजयाचा जयघोष केला. शिट्टी वाजवून आता सीमोल्लंघन करण्याची वेळ झाली, मतदारांना जागृत करून विकास साधण्याची वेळ आली अशा घोषणाही त्यांनी दिल्या.कांतीलाल कडू यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.