सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मोदी लाटेत २०१४ साली जेमतेम १५०० मतांच्या आसपास मताधिक्य घेत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत आपले कमळ बेलापुर मतदारसंघात फुलवले होते. मागच्या निवडणूकीच्या तुलनेत बदलत्या राजकीय घडामोडीमध्ये भाजपची ताकद वाढलेली असतानाही बेलापुर मतदारसंघात मराठा, मागासवर्गिय समाज व मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळालेला पहावयास मिळत आहे. या तीन ‘एम’ समाजाची नाराजी दोन दिवसात दूर करण्यात भाजपा नेतृत्वाला यश न आल्यास बेलापुरात भाजप अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील विधानसभा निवडणूकीत मंदाताई म्हात्रे यांच्याकडे फारशी वर्दळ नसतानाही कमी ताकदीच्या जोरावर अळीमिळी गुपचिळीचे राजकारण करत मंदाताईनी राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार पाडले होते, पण आता परिस्थिती तीच आहे, फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पडद्याआडून जोरदारपणे ‘अळीमिळी गुपचिळी’चे राजकारण सुरू असून त्यामुळे बेलापुर मतदारसंघात भाजपा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वंचित बहूजन आघाडीने बेलापुर विधानसभा मतदारसंघात विरेंद्र लगाडेंच्या माध्यमातून काही प्रमाणात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी अर्ज भरण्याच्या दिवशी उडालेल्या गोंधळामुळे वंचितचा अधिकृत उमेदवार बेलापुर विधानसभा मतदारसंघात आज निवडणूक रिंगणात नाही. वंचितने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी त्यात फारसा दम राहिलेला नाही. मागावर्गीय समाजाचा भाजपच्या तुलनेत वंचितचा उमेदवार निवडणूकीत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सरकू लागला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला पडलेले खिंडार, वृध्दापकाळात शरद पवारांना वणवण फिरण्याची आलेली वेळ यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये काही प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रही त्यास अपवाद राहीलेला नाही. नवी मुंबईत मराठा समाजाचे निवासी वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने अशोक गावडेंसारखा सहकारातील मातब्बर मोहरा निवडणूक रिंगणात उतरवला आहे. मार्केटमध्ये असलेले गावडेंचे अस्तित्व व मार्केटशी संलग्न समाजाचे नवी मुंबईतील निवासी वास्तव्य या बाबीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा उमेदवार व आपल्या मातीचा उमेदवार असा भावनिक प्रचार आता मराठा समाजाला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नेवू लागला आहे. या सर्व समीकरणाचा गावडेंना फायदा होणार आहे. मुस्लिम समाजाशी गावडेंच्या वाढत्या भेटीगाठी व एमआयएम निवडणूक रिंगणात नसणे यामुळे बेलापुरातील मुस्लिम मतदारही राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
बेलापुर विधानसभा मतदारसंघात असलेले पश्चिम महाराष्ट्रातील नगरसेवकांची अशोक गावडेंना असलेली सहानूभूती त्यांच्या प्रभागात ‘किमया’ दाखवू लागली आहे. सध्या भाजपच्या तुलनेत मराठा, मागासवर्गिय व मुस्लिम समाज राष्ट्रवादीकडे झुकल्याने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या छावणीत उत्साहाचे वारे संचारले आहे. हीच परिस्थिती कायम राहील्यास बेलापुर मतदारसंघात भरत जाधवच्या गावडे चित्रपटाचा रिमेक्स होण्याचा आशावाद आता सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या चर्चेतून व्यक्त होवू लागला आहे. अशोक गावडेंच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या मातब्बराला संधी मिळाली असल्याचे सांगत देशस्थ मतदारांचेही मतपरिवर्तन होवू लागले आहे. अजून प्रचाराला पाच दिवसाचा कालावधी असून या तीन ‘एम’शी भाजपा किती जवळीक साधते यावरच निवडणूकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत.