बेलापुरात राष्ट्रवादीच्या आक्रमकतेने प्रचारात वाढली चुरस
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणात प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात बऱ्यापैकी उलथापालथ होण्यास सुरूवात झाली आहे. एकेकाळी भाजप व इतर पक्षामध्ये एकतर्फी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुसंडी मारण्यास सुरूवात केल्याने लढत अटीतटीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांकडून आता ‘माती’चे ब्रम्हास्त्र उपसत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे सानपाडा, जुईनगर, नेरूळ व सिवूड आणि काही प्रमाणात तुर्भे परिसरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
एकीकडे वंचितचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने व त्या मतदारांना भाजपशी फारसे आकर्षण नसल्याने या घडामोडी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडल्या आहेत. एमआयएम व इतर मुस्लिम संघटनांचे उमेदवार नसल्याने त्याही मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बेलापुरात जोरदार प्रयत्न सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईत असल्याने या मार्केटशी संबंधित मराठी टक्क्याचे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर निवासी वास्तव्य आहे. अशोक गावडे यांचा गेल्या अनेक वर्षापासून मार्केट आवाराशी संबंध असून ते स्वत: या मार्केटचे संचालक व भाजी व्यापारी होते. अन्य उमेदवारांच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या अशोक गावडेंशी बाजार आवारातील घटकांशी व्यक्तीगत सलगी आहे.
विधानसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर अर्थकारणाचे गणित अवलंबून असले तरी अर्थकारणात अशोक गावडे काही प्रमाणात कमी पडत आहेत. ही पोकळी भरून काढण्याचे काम अशोक गावडेंना मानणाऱ्या वर्गाने जोरदारपणे सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी परस्परांशी सुंसवाद साधून अशोक गावडेंना सहकार्य करण्याचे आवाहन करू लागली आहेत. उद्याने व इतर सार्वजनिक ठिकाणी तसेच ईमारतीच्या टेरेसवर छोटेखानी बैठकांनाही सुरूवात होवून गावडेंचे प्रचार अभियान आता पश्चिम महाराष्ट्रातील घटकांनी विशेषत: युवकांनी उतस्फूर्तपणे सुरू केले आहे. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात राजकारणाशी संबंध नसणाऱ्या परंतु पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या घटकांनी आक्रमक होत आत भावनिक जवळीक साधत आपल्या मतदारांना ‘घड्याळा’कडे नेण्यासाठी मातीचे ब्रम्हास्त्र भात्यातून बाहेर काढले आहे. मातीच्या भावनिकतेमुळे बेलापुर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसशी काडीमात्र संबंध नसणारे नगरसेवक त्यांच्या प्रभागात गावडेंसाठी अळीमिळी गुपचिळीचे तंत्र अवलंबत गावडेंना मदत करू लागले आहेत.
भाजपच्या मंदाताई म्हात्रे या विद्यमान आमदार असून त्या मातब्बर समजल्या जात आहेत. परंतु भाजपचा मागील प्रचार व आताचा प्रचार यात फरक दिसत आहे. विजयी झाल्याच्या थाटात भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. भाजपचा तळागाळात प्रचार कमी पण फोटोसेशनच अधिक होत असल्याने हा फटका प्रामुख्याने भाजपला दुसऱ्या टप्प्यात बसण्यास सुरूवात झाली आहे. वार्डात वार्डात मतदारांशी जवळीक कमी, परंतु फोटोसेशनच अधिक होत असल्याचे सोशल मिडियावर दिसत आहे. केवळ मोदी या दोन अक्षरावर भाजप आजही अवलंबून असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे अशोक गावडे हे प्रचार अभियानात रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहे. गावडे कन्या व राष्ट्रवादीची उच्चशिक्षित मुलुखमैदानी तोफ असलेल्या अॅड. सपना गावडे पडद्यामागे गावडेंच्या प्रचार अभियानाची धुरा सांभाळत असल्याने ‘माझी मुलगी, माझा अभिमान ’ आज अशोक गावडेंच्या चेहऱ्यावर पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रचारात कोठेही गाफीलपणा दाखविला जात नसून फोटोसेशनवर कमी व घरटी जनसंपर्कावर अधिक भर दिला जात आहे. त्यातच मातीच्या ब्रम्हास्त्रामुळे सोशल मिडियामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये मतभेद विसरून गावडेंच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले जात आहे. भाजपचा फोटोसेशनवर भर दिला जाणारा प्रचार आणि गावडेंच्या प्रचारात सक्रिय झालेली पश्चिम महाराष्ट्रातील युवा पिढी यामुळे सुरूवातीला वाटणारी एकतर्फी लढत आता अटीतटीची होवू लागली आहे. मातीच्या ब्रम्हास्त्रामुळे उत्साही झालेले वातावरण, मुस्लिम आणि मागासवर्गियांचा वाढता पाठिंबा तसेच इतर पक्षाच्या नगरसेवकांनी दाखविलेली अनुकुलता यामुळे ‘गावडेवाडीचा उमेदवार आता ठरणार बेलापुरचा आमदार’ या घोषणा सोशल मिडियावर जनजागृती करू लागल्या आहेत.