सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदार क्षेत्रातील भाजपा-शिवसेना-आरपीआय-रयतक्रांती-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नवी मुंबईत मेगा रोड-शो केला. नवी मुंंबईच्या रस्त्यांवर अवतरलेली ही भव्य महायुतीच्या प्रचाराची लाट लोकनेते गणेश नाईक यांच्या विजयाची जणू ग्वाहीच देत होती. महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेेते या रोड-शोमध्ये सहभागी झाले होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष व भाजपानेते सुरेश हावरे, आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दवारकानाथ भोईर, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ज्येष्ठ नगरसेवक अंनत सुतार, माजी महापौर सागर नाईक, आरपीआयचे सिद्राम ओहोळ, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, युवानेते वैभव नाईक, प्रा.वर्षा भोसले यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने जल्लोषात सहभागी झाले होते. वाजत-गाजत निघालेल्या या रोड-शो मध्ये शेकडो बाईकस्वार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठिकठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आणि लोकनेते नाईक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोकनेते नाईक यांच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाशी सेक्टर १४ येथील एम. जी. कॉप्लेक्स येथून या रोड-शोची दिमाखात सुरुवात झाली. वाशी,जुहूगाव,कोपरखैरणे,घणसोली, नोसिल नाका,रबाळे, ऐरोली, दिघा मार्गे दिघा येथील पटणी रोड येथे या रोड शोची महायशस्वी सांगता झाली.