सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील लढत सुरूवातीच्या काळात एकतर्फी वाटत असली तरी प्रचाराच्या मधल्या टप्प्यात कार्यकर्त्यांच्या व आपल्या मातीच्या पाठबळावर आणि भाजप वगळता इतर विरोधी पक्षाच्या आतून मिळणाऱ्या सहकार्यावर लढत आता चुरशीची होत असल्याचे पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बेलापुरात कोणताही मोठा नेता नसतानाही केवळ आपल्या मातीचा माणूस व शरद पवारसाहेबांचा उमेदवार या एकमेव निकषावर अशोक गावडे आता प्रचारात चांगलीच मुसंडी मारू लागले आहे. प्रचारात सुरूवातीला एकतर्फी वाटणाऱ्या लढत दुसऱ्या टप्प्यावर आली असता ‘वातावरण फिरलंय, पवार-गावडेचं घड्याळ आता पुढे सरकलंय’ असे लोक आता खुलेआमपणे बोलू लागल्याने बेलापुरातील भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यात असणारी मोदी लाट, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लोकप्रिय नेतृत्व आणि बेलापुरात मंदाताई म्हात्रेंची लोकप्रियता व जनसंपर्क पाहता बेलापुरात भाजप सहज विजयी होणार व मताधिक्य किमान एक लाखाच्या आसपास असणार हा छातीठोकपणा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत होता. बेलापुर मतदारसंघात मंदाताई म्हात्रेंचे आक्रमक नेतृत्व व सोबतीला असणारी भाजपा नगरसेवकांची, कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची प्रचंड फौज असतानाही प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप राष्ट्रवादीच्या तुलनेत काही प्रमाणात पिछाडीवर पडू लागल्याचे प्रचार अभियानामध्ये व जनसामान्यांतील चर्चेमध्ये पहावयास मिळत आहे.
मुळातच दोन महिन्यापूर्वी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अचानक भाजपची ताकद वाढीस लागली. महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ वाढीस लागले. परंतु भाजपमध्ये असलेल्या खुर्द भाजप व बुद्रुक भाजप यांच्यात आजही मनोमिलाफ झाला नसल्याचे पहावयास मिळत आहे. अनेक प्रभागामध्ये प्रचार करताना खुर्द भाजपावाले बुद्रुक भाजपावाल्यांना फारसे विश्वासात घेत नसल्याचे दिसून येत आहे. खुर्द भाजपाकडून विश्वासात घेतले जात नसल्याने बुद्रुक भाजपवाले प्रचारात मनापासून सहभागी होत नसल्याचे प्रभागाप्रभागात पहावयास मिळत आहे.
महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेकडूनही भाजपला मनापासून सहकार्य मिळत नसल्याने भाजपला सध्या एकाकी प्रचारयंत्रणा राबवावी लागत आहे. शिवसेनेचे अनेक नगरसेवक छुपेपणाने व तर काही नगरसेवक खुलेपणाने आपल्या मातीचा माणूस सांगत अशोक गावडेंसाठी प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या प्रचारात जमिन आसमानचा फरक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात दिसून आला. भाजपच्या प्रचारात फोटोसेशनवर अधिक भर दिला जात असून त्याउलट राष्ट्रवादी माणसे जोडण्यावर व प्रत्यक्ष संपर्कावर अधिक भर देत आहे. राष्ट्रवादीची युवा पिढी कधी नव्हे ती प्रथमच प्रचारात आक्रमकपणे सहभागी झाल्याचे पहावयास मिळते. आपल्या भागातील माणूस , शरद पवारांचा माणूस, आपल्या मातीचा माणूस या निकषावर व भावनिक प्रचारावर अशोक गावडेंच्या उमेदवारीचा आता बोलबाला वाढीस लागला आहे. वंचितचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने ते मतदार भाजपाऐवजी राष्ट्रवादीचा पर्याय स्विकारणार असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे.
मराठी बहूल विभागात सध्या राष्ट्रवादीच्या अशोक गावडेंची वाढती हवा भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. त्यातच पुणे, नगर, नाशिक, सातारा भागातील समाजाचा गावडेंकडे वाढता कल, त्यांचा आपसातील बोलका प्रचार गावडेच्या पथ्यावर पडणार आहे. प्रचारासाठी भाजप व राष्ट्रवादीकडे अजून चार दिवसाचा कालावधी बाकी असला तरी सध्याच्या अवस्थेत वातावरण फिरलंय, पवार-गावडेंचं घड्याळ आता पुढे सरकलंय हे वातावरण भाजपासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.