सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या घरांची पुनर्बांधणी, युवकांना रोजगार, शिक्षण आणि नोकरदार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह, शासकीय वैद्यकीय कॉलेज निर्मिती करून नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी निर्माण करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बेलापूर विधानसभा उमेदवारी अशोक गावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
अशोक गावडे यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उपनेते विजय नाहटा हे सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चांगली व्यक्ती असून त्यांना बेलापूर मधून उमेदवारी जाहीर झाली नसल्याने शिवसैनिक ही नाराज आहेत. नाराज शिवसैनिक आणि विजय नाहटा साहेबांचाही आम्हाला पाठींबा असल्याचा गौप्यस्फोट ही यावेळी अशोक गावडे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना केला.
बेलापूर विधानसभेचे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार अशोक गावडे यांची पत्रकार परिषद तुर्भे येथील हॉटेल अपेटाइत येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा त्यांनी घोषित केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका काश्मीर मधील ३७० कलम हटविल्याच्या मुद्यावर सरकार लढवत असल्याची टीका अशोक गावडे यांनी बोलताना व्यक्त केली.
देशात आर्थिक मंदीची लाट असून महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर झाला आहे. महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हाती जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष काँग्रेस व मित्र पक्ष मोठ्या जिद्दीने प्रचार करीत असून सरकार आमचेच येणार असल्याचा आत्मविश्वास अशोक गावडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तरुणांच्या भविष्याची असल्याचे सांगत पक्ष सोडून गेले त्यांना जाऊ द्या जे पक्षात आहेत ते प्रामाणिक असल्याचे सांगत मतदारांनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. लोकप्रतिनिधी हा मतदार संघातील सर्व प्रश्न सोडविणारा असावा, भाजपच्या विद्यमान आमदारांचे मतदार संघात लक्ष नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नवी मुंबई मधील नेते जरी पक्ष सोडून गेले असले तरी शरद पवार यांच्या विचारांना मानणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक पक्षातच असल्याचे सांगितले.
आम्हाला राष्ट्रीय एकता दल महाराष्ट्र राज्य सह अन्य चार पुरोगामी संघटनांनी जाहीर पाठिबा दिला असल्याचे अशोक गावडे यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर नवी मुंबई शहराचा विकास झाला आहे. पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला नवी मुंबई शहरात मोठा वर्ग असल्याने नवी मुंबई शहर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि पुढेही राहणार आहे. आपण प्रचारात आधाडी घेतली असून घरोघरी मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. नवी मुंबई शहरातील नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वादाने मार्केटमधील व्यापारी ते मेट्रोपोलियन शहर म्हणून उदयाला आलेल्या नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर असा माझा आजवर प्रवास राहिला आहे. बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी व्यापारी बांधवांबरोबर माथाडी कामगारांचेही अनेक प्रश्न आपण उचलून धरले आणि त्यांना न्याय मिळवून दिला आहे. नवी मुंबई शहर हे अतिशय वेगाने विकसित होत असलेले महानगर आहे मागील काही वर्षांपासून हे शहर रोजगाराचे केंद्र बानू पाहत आहे. यामधून शहरातील तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कृतिशील कार्यक्रम आखला आहे. मतदार संघातील नागरिकांना लोकल प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी प्रयत्नशील असणार असून स्थानिक भूमिपुत्राना रोजगार आणि महिला सुरक्षा यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे अशोक गावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले शहरात गेल्या अनेक वर्षापासून गाव-गावठाण, झोपडपट्टी तसेच शहरी भागातील नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून असे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी प्राधान्य देणार असून ते प्रामुख्याने सोडविले जाणार असल्याची ग्वाही गावडे यांनी दिली आहे. मतदारांचा वाढता उत्साह पाहता मतदारसंघात राष्ट्रवादीचे पारडे जड असून आपण मोठ्या फरकाने विजयीहोऊ असा विश्वास गावडे यांनी बोलताना व्यक्त केला .
या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि नवी मुंबईचे निरीक्षक प्रशांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती भालचंद्र नलावडे, राष्ट्रवादी नेते आत्माराम बुगदे आदी उपस्थित होते.