सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने माथाडी घटकाचे प्रतिनिधी म्हणून गणेश शिंदेंना उमेदवारी दिली असली तरी कोपरखैराणे, घणसोली येथील माथाडींना मतदानासाठी गावी जाण्याचे वेध लागले आहे. माथाडी उमेदवाराला मतदान करणारा माथाडीच गावी जाणार असल्याने ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकण्यास सुरूवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकाच दिवशी मतदान होणार असल्याने सर्वाधिक फटका नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा लढविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे. मागील निवडणूकांमध्ये राज्यात दोन ते तीन टप्प्यात मतदान होत असल्याने माथाडी घटक गावी मतदान करून नवी मुंबईतही मतदान करायला येत असे. यावेळी एकाच दिवशी सर्वत्र मतदान असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवी मुंबईतील समीकरणे बिघडली आहेत. नवी मुंबईत कोपरखैराणे भागात माथाडी घटकाचे निवासी वास्तव्य प्रचंड असून त्याखालोखाल घणसोली, नेरूळ, ऐरोली, तुर्भे परिसरात माथाडी घटकाचे वास्तव्य आहे.
नवी मुंबईतील माथाडी घटक सातारच्या आपल्या गावाकडील उमेदवारांना मतदान करण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असतात. सातारानंतर पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील लोकांचे माथाडी म्हणून नवी मुंबईत मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर माथाडी नेते शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यांना त्यांच्याच मतदारसंघात अटीतटीची लढत असल्याने मतदारसंघात अडकून राहण्याची वेळ आली आहे.
माथाडी घटकांनी गावी मतदानासाठी यावे यासाठी नेहमीप्रमाणे ऐरोली विधानसभा मतदारसंघात बैठकांचे नियोजन सुरू झाले आहे. माथाडींची यादी गावाप्रमाणे बनविण्यात आली असून लक्झरी बसेसचेही नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या गावाला कोणत्या क्रमाकांची बस जाणार आहे याचीही जय्यत तयारी झाली असून ऐरोली मतदारसंघातील गणेश शिंदेंना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसणार आहे.