सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सहकारातील बालेकिल्ला व शरद पवार समर्थकांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
बाजार समिती आवारात व्यापारी, खरेदीदार, माथाडी, मापाडी, वारणार, पालावाल महिला, बाजार समिती कर्मचारी-अधिकारी यात मराठी टक्का मोठ्या प्रमाणावर असून या घटकांवर शरद पवारांचा पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव आहे. मार्केट आवारातील घटकांना अडीअडचणींच्या काळात शरद पवारांनी कधीही वाऱ्यावर सोडले नसल्याची कृतज्ञता आजही बाजार आवारातील घटक उघडपणे बोलून दाखवित आहेत.
मंगळवारी सकाळी ८ वाजता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये प्रचार अभियानास व बाजार आवारातील घटकांशी सुसंवादास सुरूवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता फळ मार्केट, १० वाजता कांदा बटाटा मार्केट, ११ वाजता मसाला मार्केट, १२ वाजता दाणाबंदर मार्केट आणि त्यानंतर या अभियानाची सांगता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिली.
या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक तेजस शिंदेही या अभियानात सहभागी होणार असल्याचे महादेव पवार यांनी सांगितले.अशोक गावडे हे स्वत: अनेक वर्षे भाजी मार्केटमध्ये व्यापारी म्हणून कार्यरत असून अनेक वर्षे ते मार्केटचे संचालकही होते. अतिरिक्त भाजी मार्केटची उभारणी ही अशोक गावडेंच्या परिश्रमाची पोचपावती आहे. त्यातच गावडे यांनी नवी मुंबईच्या उपमहापौरपदाची धुरा सांभाळताना त्यांचा जनसंपर्कही वाढीस लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार हे नवी मुंबईतील राजकारणात, सहकारात व सामाजिक क्षेत्रात परिचित असल्याने आता २४ ऑक्टोबरला गुलाल राष्ट्रवादीच उधळणार असल्याचे महादेव पवार यांनी सांगितले.