पुन्हा संघर्ष करण्याकरिता उर्जा देणारा निकाल
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालातून जनतेने सत्ताधा-यांचा सत्तेचा माज उतरवला असून विरोधी पक्ष दिसत नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना अधिक ताकदवर विरोधी पक्षाचे दर्शन जनतेने करून दिले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, गेली ५ वर्ष सातत्याने विविध निवडणुकांमध्ये एकतर्फी निर्णय येत होता. परंतु हा निकाल पुन्हा उभारी देणारा व भाजप शिवसेनेच्या हुकुमशाही विरोधात संघर्ष करण्याकरिता ऊर्जा देणारा आहे. गेली पाच वर्ष सातत्याने सत्ताधा-यांनी लोकशाही विरोधी भूमिका घेऊन राज्य केले आहे. साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याकरिता यंत्रणांचा वापर आणि विरोधी पक्ष फोडण्याकरिता सर्व अनैतिक मार्गांचा उपयोग या सरकारने केला. सत्ताधा-यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये राज्यातील मुलभूत प्रश्नांना बगल देण्याकरिता स्वतःचे मुद्दे लादले हे जनतेला आवडलेले नाही. जनतेच्या विरोधातही दडपशाहीचा मार्ग या सरकारने स्वीकारला होता, हे आरे कॉलनी असेल वा अन्य ठिकाणी पहायला मिळाले. एके ठिकाणी प्रचंड आक्रोश असताना सत्ताधा-यांची वक्तव्ये ही अहंगंड दर्शवणारी होती. जनतेने हा अहंकार मोडून काढला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजकारण हे भाजपला मदत करणारे आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही मतांपासून कायम वंचीत होईल हे ही या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. जनतेला गृहीत धरू नये हा संदेश सत्ताधा-यांना जनतेने दिला असून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनोबल वाढवणारी ही जनतेची मन की बात आहे.
या निवडणुकीतून स्वतःच्या स्वार्थाकरिता पक्ष आणि विचारधारेंचा त्याग करणा-यांनादेखील जनतेने धडा शिकवला आहे. अनेक मंत्री तर पडलेच तर स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री घोषीत करणा-याही पडल्या यातून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठ्या प्रमाणात होता हे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या यशाचा काँग्रेस पक्षाला आनंद आहे आणि काँग्रेसची विचारधारा पुन्हा मजबूत होत आहे याचे समाधान आहे. या पुढील काळात काँग्रेस समविचारी पक्षांच्या मदतीने भाजपच्या अनैतिक व हुकुमशाही मानसिकतेचा निकराने विरोध करत राहील असे सावंत म्हणाले.