नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदार क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी दणदणीत विजय प्राप्त केला असून ७८,४९१च्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते जिंकले आहेत.
ऐरोली मतदार संघासाठी २१ ऑक्टोबर रोजी ४२ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ४,६१,३४९ मतदारांची नोंद झाली होती. त्यापैकी १,९६,१२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी ऐरोलीतील सरस्वती विद्यालयात मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या एकूण ३२ फेर्या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच लोकनेते नाईक यांनी मतांची आघाडी घेत ती शेवटपर्यत कायम ठेवली. लोकनेते नाईक यांना एकुण १,१४,६४५ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंगे्रसचे गणेश शिंदे यांना ३६,१५४ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश बानखेले यांना २२,८१८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ढोकणे यांनी १३,४२४ मते प्राप्त केली. लोकनेते नाईक यांनी ७८,४९१ मते प्राप्त करीत आपला विक्रमी विजय नोंदवला. ५२०१ मतदारांनी आपला नोटाचा पर्याय वापरला. निवडणूक निर्णय अधिकारी अभय करगुटकर यांच्या हस्ते लोकनेते नाईक यांनी निवडणूक आयोगाचे विजयाचे प्रमाणपत्र स्विकारले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, युवानेते संकल्प नाईक आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकनेते नाईक यांच्या विजयानंतर त्यांची जल्लोषात वाजत-गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली. लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी जनतेचे आभार मानले. यानंतर वाशी येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला त्यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.
सर्वाधिक मताधिक्क्य प्राप्त करणारे दहावे उमेदवार
राज्य विधानसभा निवडणूक २०१९मध्ये सर्वाधिक मताधिक्क्य प्राप्त करणार्या उमेदवारांमध्ये लोकनेते गणेश नाईक यांनी दहावा क्रमांक पटकावला आहे. १९९५ आणि २००४च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखांपेक्षाही अधिक मताधिक्य घेत त्यांनी जिंकण्याचा विक्रम केला होता. असा विक्रम करणारे ते एकमेव उमेदवार होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेवून देशाला प्रगतीपथावर नेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्राचा सर्वच क्षेत्रात सर्वागिण विकास केला. त्याचाच परिपाक म्हणून राज्यात महायुतीला जनतेचा कौल मिळून महायुतीचेच सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. माझया विजयात महायुतीच्या सर्वच घटकपक्षांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या श्रमाचा वाटा आहे. नवी मुंबईकरांच्या आशा-आकांक्षानुरुप कार्य करणार आहे.
– लोकनेते गणेश नाईक