श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे ओला दुष्काळाचे संकट ओढवले आहे. सदर ओला दुष्काळाचा फटका औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मुले जेथे जेथे शिक्षण घेत आहेत तेथे जाऊन शहरी भागातील लोकप्रतिनिधीनी मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आवाहन केले होते. मुख्यमंत्री महोदयांच्या याच आवाहनाच्या अनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत केली आहे. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना एक आधार देण्याकरिता “एक हात मदतीचा” या संकल्पनेतून ३०० विद्यार्थ्यांना रु. ६ लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. सदर विद्यार्थी आर्थिक अडचणीत असल्याचे वृत्त पाहिल्यानंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजकडून रु. ३ लाख, नवी मुंबई हरयाणा वेल्फेयर असोशिएशन यांजकडून रु. २ लाख तसेच जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक अमित पाटील, व नवी मुंबईतील जीवाभावाचे मित्र वॉट्सअप ग्रुपच्या सदस्य यांजकडून रु. १ लाख रोख रक्कम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या हातात देण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापक किशोर शितोळे, हरियाणा वेल्फेयरचे अध्यक्ष बलबीरसिंग चौधरी, सत्यवान वर्मा, राजवंती वर्मा, नवी मुंबई जीवाभावाचे मित्र ग्रुपचे सदस्य रवींद्र भगत, मनोज मेहेर, दिनेश चौधरी तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, सर्व सामान्य कुटुंबातून मी पुढे आलेली आहे. विद्यार्थीदशेत असतांना आम्हालाही आर्थिक अडचणींना सामना करावा लागला आहे. त्यामुळे या जाणिवेतुनच बातमी पाहून येथे मदत करण्याचा निर्णय घेतला. सध्यातरी सहा लाख रुपयांची मदत करीत आहे. इतरही मदतीचे हात समोर येत आहेत, शासन प्रत्येक ठिकाणी पोहचू शकणार नाही. त्यामुळे आपण अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले. या अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांनी सयंम ठेवत अभ्यासावर लक्ष ठेवले पाहीजे. आपण महामानव असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात शिक्षण घेत आहात. त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. काही राजकारणी विद्यार्थ्यांचा स्वार्थासाठी वापर करीत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले शिक्षणाचे ध्येय साध्य केले पाहीजे. गरिबी दुष्काळाची टिमकी वाजविण्याएवजी अडचणींवर मात करत पुढे या, अभ्यास करा, शिकलात तरच डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचा पाया मजबूत केला असे म्हणता येईल, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी सांगितले की, बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी फक्त एका वृत्तवाहिनीवर पाहिलेल्या बातमीने आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेत त्यांना तात्काळ ६ लाख रूपयांची मदत केली. आज विद्यार्थ्यांना एक आधार मिळाला असून सर्व विद्यार्थी व विद्यापीठातर्फे मी त्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.