श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीनंतर राजकीय घडामोडी बदलत गेल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र करून गोवण्याचा प्रयत्न झाला. त्या काळातील १५ दिवसात जे पाहायला नको होते ते पाहायला मिळाले, प्रतिमा मलीन करायला कोठेही कोणीही कसूर ठेवत नव्हते. इतकेच नाही तर कालपरवापर्यत पक्षामध्ये सोबत असणारे विचित्र सूर आळवत होते. कार्यकर्त्यांचे फोन येत होते, सर्व कळत होते, पण त्याकाळी मी केवळ वकीलांच्या भूमिकेत होते, माझ्यासाठी माझ्या वडीलांचा जामिन महत्वाचा होता, त्या काळी मला माझ्या वडीलांसाठी मुलीची भूमिका पार पाडायची होती अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी मांडली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे नेरूळ सेक्टर २८ मधील श्रीगणेश सोसायटीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आभार प्रदर्शन करताना नगरसेविका अॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी उपस्थितांसमोर बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कोणत्या दुश्मनावरही अशी वेळ येवू नये, इतके वाईट दिवस १५ दिवसात अनुभवयास मिळाले. आपले कोण, परके कोण याचा अंदाज नव्हता. पक्षातील मंडळीही सह्याची मोहीम राबवित होती. कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून पक्षात एकी ठेवण्याऐवजी काही घटक चुकीचा संदेश देण्यात व्यस्त होते. इतक्या वाईट दिवसात पक्षातून ज्यांची साथ अपेक्षित होती, तीही मिळाली नसल्याचे सांगत अॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी कार्यकर्त्यांमध्ये पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहीत करण्याचे काम केले. पक्षसंघटना, पक्षबांधणी यावर मार्गदर्शन केले. निवडणूक काळात कोणी दुखावले गेले असल्यास तर त्यांनी आपणास माफ करावे असेही सपना गावडे-गायकवाड यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले.
- पवारसाहेबांना बाबा म्हणूनच संबोधले
शरद पवारसाहेबांचा आमचा बालपणापासूनच संबंध आहे. त्यांना आम्ही साहेब म्हणून नाही तर बाबा म्हणूनच लहाणपणापासूनच संबोधले. लहाणपणापासून ज्या नेतृत्वाला आदर्श मानत आम्ही मोठे झालो, त्या नेतृत्वापासून आम्ही वेगळे राहू शकतच नाही. पवारसाहेबांचे विचार आमचा श्वास आहे. त्यामुळे शेवटपर्यत आम्ही पवारसाहेबांचे समर्थकच राहणार आहोत.
- अॅड. सपना गावडे-गायकवाड