श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : या शहराच्या प्रगतीसाठी शरद पवारसाहेबांनी मोलाचे योगदान दिले आहे, हे नवी मुंबईकरांनाही माहिती आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग नवी मुंबईत आहे. राजकीय पडझडीच्या काळात नवी मुंबईकरांनी शरद पवारांच्या विचाराला विधानसभा निवडणूकीत मतपेटीतून साथ दिलेली आहे. माणूस महत्चाचा नाही तर पक्ष महत्वाचा आहे, विचार महत्वाचा आहे. कमी कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवी मुंबईत झालेले ८३ हजार मतदान ही कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची पोचपावती असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी करताना विधानसभा निवडणूकीत काम केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विधानसभा निवडणूकीनंतर प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवी मुंबईतील बेलापुर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी सुसंवाद मेळाव्याचे आयोजन नेरूळमधील सेक्टर २८ येथील श्रीगणेश सोसायटीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाच्या समोर करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना अशोक गावडे बोलत होते.
सर्वप्रथम कार्यकर्त्यांचे आभार मानायला विलंब झाल्याबद्दल अशोक गावडे यांनी कार्यकर्त्यासमोर दिलगिरी व्यक्त केली. कमी दिवसाच्या कालावधीत महायुतीला टक्कर देताना बेलापुरात राष्ट्रवादीला मिळालेले ४५ हजार व ऐरोलीत मिळालेले ३८ हजार मतदान हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच शक्य झालेले आहे. संघटना बांधणी नसताना, फारशी कुमक नसताना इतके मतदान खेचून आणण्याचे अग्निदिव्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे शक्य झालेले असल्याचे सांगत अशोक गावडे यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकवार कार्यकर्त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
महापालिका निवडणूका जवळ आल्या आहेत. पक्षाला यश मिळवायचे असेल तर संघटना बांधणी महत्वाचे आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी संघटना वाढीसाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे. पक्ष आपले घर आहे. कोणी अडचणीत असल्यास त्याला मदत करा, त्याला आणखी अडचणीत आणण्याचे काम करू नका. पक्ष वाढला तरच पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना किंमत प्राप्त होणार आहे. पक्षाला जनाधार असल्याचे विधानसभा निवडणूकीत स्पष्ट झाल्याचे अशोक गावडे यांनी स्पष्ट केले.
मला विविध प्रकरणात अडकण्याचे राजकीय षडयंत्र सुरू आहे. मला अडकवून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे उद्योग सुरू आहेत. आरोप झाले आहेत. कोर्टात सर्व स्पष्ट होईल; मला जामीनासाठी विलंब झाला, परंतु त्या काळात विविध लोकांनी उद्योग केले. कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून दिलासा देण्याऐवजी उलटसूलट चर्चा घडवून आणल्या गेल्या. पक्ष महत्वाचा आहे. पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाचे विचार आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. पालिका निवडणूकीला सामोरे जाताना भक्कम पक्षसंघटनेच्या माध्यमातून जनसामान्यात पक्ष नावारूपाला आणण्याचे आवाहन अशोक गावडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी जी.एस.पाटील, विलास हूले, राजेश भोर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी समयोचित भाषणे झाली. यावेळी नगरसेविका सपना गावडे-गायकवाड, महादेव पवार, राजेश भोर, अनिल गावडे, रोहित गोरडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.