मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील सत्तेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. भाजपानं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केलं. या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. या याचिकेवर काल सुनावणी झाली असून, आज सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. तर दुसरीकडं आमदारांना एकसंध ठेवून भाजपाला बहुमत चाचणीत पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.