सुवर्णा पिंगळे : खांडगेपाटील / Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : बहुमत चाचणी होईल तेव्हा आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असेल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला. ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात झालेला कार्यक्रम हा महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर १६२ आमदार सोबत आहेत हे राज्यपाल आणि राष्ट्रपतींना दाखवलं असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
राज्यपालांना खोटं बहुमत दाखवत मुख्यमंत्र्यांना चोरट्यासारखी शपथ देण्यात आली होती. कोणाकडे बहुमत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळावं यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेच संविधान बाबासाहेबांनी तयार केलं होतं का ? अशी विचारणा यावेळी संजय राऊत यांनी केली. ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांना सरकार स्थापन करण्याचा अधिकार कोणी दिला ? असा सवालही त्यांनी विचारला. “संविधानात ज्याच्याकडे बहुमताचा आकडा आहे त्याला पंतप्रधान, मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते. पण अजित पवारांनी दाखवलेल्या खोट्या पत्रावर विश्वास ठेवून शपथ देण्यात आली. राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या करण्यात आली,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बहुमत आहे तर मग लांब का पळत आहात? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. नारायण राणे यांनी फक्त १३० आमदार उपस्थित होते यासंबंधी प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं योग्य नाही, नारायण राणे काहीही बोलतात असल्याचं म्हणत उत्तर देणं टाळलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना जयंत पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते असल्याचं त्यांनी सांगितलं. आशिष शेलार यांच्यावर टीका करताना, महाराष्ट्रात असे अनेक खोटारडे लोक फिरत आहेत असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड करु नका असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ” मी एक शिवसैनिक आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असा प्रयत्न असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
“अजित पवार जागतिक स्तरावरचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. कालपर्यंत आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते. राज्य कसं चालवायचं सांगत होते. अशा महान विचारांची माणसं महाराष्ट्रात जन्माला आली आहेत,” असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला.