सुवर्णा पिंगळे : खांडगेपाटील / Navimumbailive.com@gmail.com
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. लोकांना चांगलं सरकार मिळवण्याचा अधिकार आहे, असं मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडून महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला. बहुमत चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसंच मतदान हे गुप्त पद्धतीनं नको, असंही न्यायालयानं सांगितलं. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्ही तिन्ही पक्ष समाधानी आहोत. बहुमत चाचणीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
दुसरीकडे आम्ही विश्वासमत नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. तर न्यायालयानं दिलेल्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.