६,५०० कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक ९० कोटी रुपये तात्काळ देण्याची मनसेची मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी अमित राजसाहेब ठाकरे मैदानात
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेत घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणी पुरवठा अश्या विविध १७ विभागात काम करणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचे किमान वेतन फरक ९० कोटी रुपये व कचरा वाहतूक कामगारांचे ४३ महिन्यांचे किमान वेतन फरक तात्काळ मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिकेवर थाळीनाद महामोर्चा काढण्यात येणार आहे. गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सकाळी ठीक १० वाजता सिवूडस रेल्वे स्टेशन (पश्चिम) ब्रिजखालून या थाळीनाद महामोर्चाला सुरुवात करण्यात येणार असून महापालिका मुख्यालय येथे महामोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे.
या महामोर्चाचे नेतृत्व स्वतः अमित राजसाहेब ठाकरे करणार आहेत. या महामोर्चामध्ये चार ते पाच हजार कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातला हा पहिला महामोर्चा असेल ज्या मोर्चाचे नेतृत्व स्वतः अमित राजसाहेब ठाकरे करतील आणि त्याची सुरुवात हि नवी मुंबईतून होईल.
फेब्रुवारी सन २०१५ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतन फरक मिळावा यासंदर्भातील आदेश निर्गमित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतुद करून सदर प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळून सुद्धा यावर्षीचा नोव्हेंबर महिना संपला तरी या कामगारांचे १४ महिन्यांचे ९० कोटी रुपये थकीत वेतन तसेच उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कचरा वाहतूक कामगारांचे ४३ महिन्यांचे थकीत वेतन अद्याप मिळालेले नाही. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच शहर अभियंता यांना अनेकदा भेटून निवेदने दिली. तरी सुद्धा कंत्राटी कामगारांच्या बाबतीत महापालिका प्रशासनाला कोणतेच सोयरे सुतक नसल्याचे मनसेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना खडबडून जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, चिटणीस गजानन ठेंग, सहचिटणीस संजय सुतार, मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे, उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, महिला सेना शहर अध्यक्षा डॉ.आरती धुमाळ, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे, मनसे उपविभाग अध्यक्ष विनोद पाखरे, मनविसे उपशहर अध्यक्ष सनप्रित तुर्मेकर, मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे उपस्थित होते.