नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ येथील महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानात पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी गुरूवारी (दि. २८ नोव्हेंबर) महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर ४ परिसरात महापालिकेच्या विभाग कार्यालयासमोरच महापालिकेचे नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान आहे. या उद्यानात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यत प्रेमी युगुल बसलेले पहावयास मिळतात. यापैकी अनेक प्रेमी युगुलांचे खुलेआमपणे अश्लिल चाळे चालत असतात. या उद्यानाच्या सभोवताली पूर्णपणे सिडको वसाहती असून येथील सदनिकांमधील रहीवाशांना अगदी घरातूनही हे अश्लिल चाळे पहावयास मिळतात. घरातील मुला-मुलींवर वाईट संस्कार होवू नये म्हणून घराच्या खिडक्या बंद ठेवाव्या लागत असल्याचे स्थानिक रहीवाशांचे म्हणणे असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय उद्यानात सांयकाळनंतर चरसी, गर्दुल्यांचेही प्रमाण अलिकडच्या काळात वाढीस लागले आहे. उद्यानात पालिका प्रशासनाने पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नियुक्त करून या प्रेमी युगुलांच्या अश्लिल चाळ्यांना व गर्दुल्यांच्या अस्तित्वाला आळा बसेल. याप्रकरणी हवी असेल तर पालिका प्रशासनाने स्थानिक नेरूळ पोलिसांचीही मदत घ्यावी. पोलिसांनी गस्त वाढविल्यास हे प्रकार लवकरात लवकर संपुष्ठात येतील.
समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहीवाशांची मागणी लक्षात घेता उद्यानात पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नेमावे व पोलिस गस्तीकरीता नेरूळ पोलिसांचीही मदत घेण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.