नवी मुंबई : प्रभाग ८५ व ८६ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटारांची नियमितपणे स्वच्छता करण्याची लेखी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
आपल्या लेखी निवेदनात संदीप खांडगेपाटील यांनी पुढे म्हटले आहे की, प्रभाग ८५ व ८६ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात सतत डासांचा उद्रेक व साथीच्या आजाराचे रूग्ण पहावयास मिळतात. येथील गटारे स्वच्छ व तळापासून वेळोवेळी सफाई केल्यास बऱ्यापैकी साथीच्या आजाराला आळा बसेल. अनेकदा पावसाळा येण्यापूर्वी गटारांची झाकणे उघडलेली व सफाई होत असलेली निदर्शनास येते. पालिका मुख्यालयात उपायुक्तांच्या दालनात मिळालेल्या माहितीनुसार, वर्षामध्ये चार वेळा गटारांची तळापासून सफाई होणे आवश्यक असते. अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्र दिल्यावर गटारांची सफाई होते. मग त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्या तुंबलेल्या गटाराचे, कचरा काढतानाचे फोटोही सोशल मिडियावर ‘व्हायरल’ होतात. हे चित्र स्वच्छतेचे पुरस्कार सतत मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. त्यामुळे गटार साफ करणाऱ्या ठेकेदाराला आपण बोलावून वर्षातून चार वेळा गटारांची तळापासून सफाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
गटारांची तळापासून सफाई झाल्यास गटारे चोकअप होणार नाहीत, स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही व साथीच्या आजारालाही नियत्रंण बसेल. ज्या ज्या वेळी ठेकेदार गटारांची तळापासून स्वच्छता करेल, त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना व इतर राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना द्यावी. ज्यायोगे सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहामधील सर्वच गटारांची तळापासून सफाई करण्यात सर्वच ‘सुपरवायझर’ची भूमिका बजावतील. हे निवेदन भेटताच प्रभाग ८५ व ८६ मधील सर्वच गटारांची तळापासून सफाई करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनात संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.