नवी मुंबई : प्रभाग ८५ मधील प्लॉट २१ वर असलेल्या वाणिज्य व व्यावसायिक जागेवर महापालिका प्रशासनाने अर्धवट अवस्थेत बसविलेले रेलिंग तेथील व्यावसायिकाचे हितसंबंध जोपासण्यासाठी पूर्ण केले नाहीत. ते तात्काळ पूर्णपणे बसविण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
प्रभाग ८५ मधील प्लॉट २१ वरील अर्धवट रेलिंग वादाच्या भोवऱ्यात?महापालिका प्रभाग ८५ मध्ये बकालपणाला व अतिक्रमणाला खतपाणी घालत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. प्रभाग ८५ मधील बकालपणाकडे व अतिक्रमणाकडे पालिका प्रशासनाचा होत असलेला कानाडोळा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याचे उत्तरदायित्व विभाग अधिकारी यांचेच आहे. प्रभाग ८५ मधील प्लॉट २१ वर पूर्णपणे वाणिज्यिक व व्यावसायिक वापर होत आहे. पदपथावर बसविण्यात आलेले अर्धवट अवस्थेतील रेलिंग हे कशाचे उदाहरण आहे. या संघी टायरर्सचे दुकान असून या दुकानासमोर पदपथावरच नेहमी वाहने उभी असतात. विशेष म्हणजे या टायरवाल्याकडे वाहने जाण्यासाठी रस्त्यावरून पदपथापर्यत डांबरीकरण (स्लोप) करण्यात आले आहे. हेच चित्र झामाच्या दुकानाजवळही हेच चित्र आहे. या दुकानाजवळ अर्धवट अवस्थेत बसविण्यात आलेले रेलिंग पाहता या ठिकाणच्या अतिक्रमणाला महापालिका प्रशासनच खतपाणी घालत आहे. टायरवाला व झामावाला महापालिका प्र्रशासनाचे जावई आहेत काय? त्यांचे आजवर इतके लाड कशासाठी? रेलिंग पूर्णपणे का बसविण्यात आले नाही? असा प्रश्न लेखी तक्रारपत्रात मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
या ठिकाणाहून सारसोळे गावचे ग्रामस्थ मासेमारीसाठी ये-जा करताना तसेच सेक्टर ६ मधील रहीवाशी, महिला, मुले हे देखील कामानिमित्त येथून ये-जा करत असतात. त्यांना येथील पदपथावरील अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्धवट बसविण्यात आलेल्या रेलिंगची व रस्त्यावरून थेट पदपथापर्यत करण्यात आलेल्या डांबरीकरणाची (स्लोप) चौकशी करून लेखी अहवाल मिळावा. विशिष्ठ दुकांनाना देण्यात आलेली सवलत देण्यासाठी अर्धवट अवस्थेतील रेलिंग हा प्रकार कोणामुळे घडला, कोणी दबाव आणला, कोणाची मर्जी राखण्यासाठी रेलिंग अर्धवट अवस्थेत सोडले या सर्व प्रकाराची महापालिका प्रशासनाकडून चौकशी होणे आवश्यक आहे. पत्र मिळताच लवकरात लवकर रेलिंग पूर्णपणे बसविण्यात यावे, पदपथ ते डांबरीकरणाची सुविधा (स्लोप) काढून टाकावी अशी मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.