नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. २० – ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा थेट १०० ते १५० रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्यामुळे गोरगरिबांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा, हा मूळ हेतू डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक, सानपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून स्वस्त दरात म्हणजे फक्त ४० रुपये किलोने १००० किलो कांदा वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबविलेल्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सानपाडा विभागातील गोरगरीब जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे सानपाडा-पामबीच विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी केले आहे.
११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल गोल्डन पॅलेस चौक, पारसिक बँकच्या समोर, टेम्पो स्टॅन्ड, सेक्टर – ५, सानपाडा या ठिकाणी करण्यात आले आहे. हा उपक्रम फक्त सानपाडा विभागापूरताच मर्यादित असून कांदा खरेदीसाठी येताना पॅनकार्ड, आधारकार्ड तसेच मतदान ओळखपत्र सोबत घेऊन यावे. प्रत्येकाला फक्त २ किलो कांदा खरेदी करता येईल. कांदा खरेदी करण्यासाठी येताना सोबत कापडी पिशवी घेऊन यावे, अशा सूचना मनसेचे सानपाडा-पामबीच विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी केल्या आहेत.