पुन्हा असा प्रकार घडल्यास राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला आंदोलनाचा इशारा
स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत देयक वितरणास विलंब होत असून त्याचा नाहक भुर्दंड स्थानिक रहीवाशांना भोगावा लागत आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिला आहे.
दोन दिवसापूर्वी रहीवाशांना विद्युत देयके वितरीत करण्यात आली , त्या विद्युत देयकावर वीज बिल भरणा २५ तारखेपर्यत न केल्यास २० रूपये दंड आकारला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. वीज देयक रहीवाशांच्या हातात कंपनीकडून २५ तारखेलाच सांयकाळी ६ नंतर भेटली. त्यामुळे रहीवाशांना नाहक दंड भरावा लागणार आहे. वीज देयक वितरणास झालेला विलंब वा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नमुना आहे. या प्रकाराची चौकशी करावी आणि असा प्रकार पुन्हा घडल्यास आपल्या कंपनी कार्यालयात येवून आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा महादेव पवार यांनी दिला आहे.