महाराष्ट्र कर्मचारी युनियन व इंटकच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी काही दिवसापूर्वी स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. कर्मचाऱ्यांचे झालेले निलंबन अन्यायकारक असून ते निलंबन मागे घ्यावे म्हणून महाराष्ट्र कर्मचारी युनियन व नवी मुंबई इंटकने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शनिवार, दि, ४ जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांनी अखेरिला स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांचे निलंबन मागे
घेतले. आयुक्तांच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियन व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांचे आभार मानत त्यांचे पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत अभिनंदन केले आणि उर्वरित दोन कर्मचाऱ्यांचेही लवकरात लवकर निलंबन मागे घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी यावेळी केली.
महापालिका आयुक्त मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कामगार एका विशिष्ठ दबावाखाली काम करत असल्याचे नवी मुंबई इंटकचे व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांचे शिष्टमंडळ घेवून जात पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. शनिवारी आयुक्तांनी अरूण पाटील यांचे निलंबन मागे घेतल्यावर नवी मुंबई इंटकचे व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कार्याध्यक्ष सिद्धार्थ चौरे, सचिव मंगेश गायकवाड, पालिकेतील सर्व स्वछता निरीक्षक यांनी आयुक्त मिसाळ यांची भेट घेऊन यापुढे चांगले काम करून दाखवू असे सांगितले ,आयुक्त मिसाळ यांनी चांगल्या कामासाठी मी तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत चांगले काम करा व पालिका प्रशासनाचा नावलौकीक वाढवा असे आवाहन केले. यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी इतर २ अधिकाऱ्यांचेही निलंबन मागे घ्या अशी आयुक्त मिसाळ यांना विनंती केली.